नवी दिल्ली : स्कॉटलंड मध्ये ग्लासगो येथे सध्या सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकणाऱ्या पॅरा पॉवरलिफ्टर झंडू कुमार यांचा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी त्यांच्या निवासस्थानी सत्कार केला. झंडू कुमार यांनी पुरुषांच्या हेवीवेट गटात १९० किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले. बिहार मधील नालंदा येथे एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या झंडू कुमार यांचा मनसुख मांडवीय यांनी १० लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सत्कार केला. केंद्रीय क्रीडा मंत्र्यांना भेटण्याविषयीच्या त्यांच्या अनुभवाबद्दल विचारले असता झंडू कुमार म्हणाले: केंद्रीय क्रीडा मंत्र्यांची भेट म्हणजे मला विशेष सन्मान वाटला. किती लोकांना त्यांच्या जीवनात केंद्रीय मंत्र्यांना भेटण्याची संधी मिळत असेल? मला असे कधीच वाटले नव्हते की खेळांमधील कामगिरीसाठी कधी माझा गौरव केला जाईल. डॉ मांडवीय यांनी मला स्कॉटलंड मधील माझ्या अनुभवांबद्दल विचारले, त्यांच्याशी संवाद साधणे ही खरंच एक सुखावह भावना होती.
जून २०२३ मध्ये मुख्य पॅरा प्रशिक्षक राजेंद्र रहालू यांनी साई एनसीओई गांधीनगर येथे प्रशिक्षणासाठी निवडण्यापूर्वी, झंडू नालंदाच्या हरनौत शहरात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी भाजीपाला विकायचे आणि ई-रिक्षाही चालवायचे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळी आपल्या कामगिरीबद्दल समाज माध्यमावर पोस्ट केली त्यावेळी आनंद गगनात मावेनासा झाला, असे झंडू कुमार यांनी सांगितले. पदक जिंकल्यापासूनचा आनंद, उत्साह आणि रोमांच इतका जास्त आहे की मला नीट झोपही लागलेली नाही. माझा फोन सारखा खणखणत असतो. ज्यावेळी पंतप्रधानांनी माझ्याबद्दल समाज माध्यमावर पोस्ट केली तेव्हा मी अत्यंत आनंदित झालो. मला वाटते भारतीय क्रीडाक्षेत्राने एक उत्तुंग झेप घेतली आहे, आपले पंतप्रधान खेळाडूंना देत असलेले सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि पाठिंब्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.
ग्लासगो येथील यशाच्या आधी झंडू कुमार यांनी खेलो इंडिया पॅरा क्रीडास्पर्धा २०२४ आणि २०२५ मध्ये पाठोपाठ रजत आणि सुवर्ण पदक पटकावले आहे. खेलो इंडिया योजनेअंतर्गत घडलेला हा खेळाडू आता १८ ते २४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान जपानमधील ऐची-नागोया येथे होणाऱ्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेवर लक्ष केंद्रित करत आहे.जेव्हा आपल्याला देशाच्या नेतृत्त्वाकडून पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळते, तेव्हा यापेक्षा अधिक उत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. आशियाई पॅरा स्पर्धेसाठी तयारीसाठी गांधीनगरला परतण्यापूर्वी, मी थोड्या कालावधीसाठी माझ्या गावी जाऊन माझ्या कुटुंबियांना भेटून येईन. चीन एक प्रबळ दावेदार आहे, मात्र मी माझ्या देशासाठी पदक मिळवण्यासाठी माझे सर्वोत्तम प्रयत्न करेन, असे वचन मी देतो, असे म्हणत झंडू यांनी निरोप घेतला.