लिटन दासची बांगलादेशच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती

0

ढाका : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) २०२७ च्या क्रिकेट विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवून, अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज लिटन दास याची बांगलादेश एकदिवसीय संघाच्या नव्या कर्णधारपदी नियुक्ती केली. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ‘एक्स’ वर लिहिले, “अभिनंदन, लिटन कुमार दास! बांगलादेश एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार.” लिटनने मेहिदी हसन मिराजची जागा घेतली आहे. मिराज जून २०२५ पासून संघाचे कर्णधारपद भूषवत होता, पण या महिन्याच्या सुरुवातीला झिम्बाब्वेविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर त्याला पदावरून हटवण्यात आले होते.

मिराजच्या कर्णधारपदाखाली बांगलादेशने २० पैकी १० एकदिवसीय सामने जिंकले आणि नऊ गमावले. लिटन आधीपासूनच टी-२० आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे आणि आता तो एकदिवसीय संघाचीही जबाबदारी सांभाळेल.लिटन दासने यापूर्वी एकदिवसीय संघाचे हंगामी कर्णधार म्हणून नेतृत्व केले आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली बांगलादेशने सातपैकी तीन सामने जिंकले होते.२०२७ च्या विश्वचषकाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर, ही नियुक्ती बांगलादेश क्रिकेटसाठी एका नव्या युगाची सुरुवात मानली जात आहे.

लिटन दास गेल्या ११ वर्षांपासून बांगलादेशसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळत आहे. या काळात, त्याने ५४ कसोटी सामन्यांमधील ९४ डावांमध्ये ३६.४७ च्या सरासरीने ३,३५६ धावा केल्या आहेत, ज्यात सहा शतके आणि २० अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, त्याने १०४ सामन्यांमध्ये (१०३ डावांमध्ये) ३०.८४ च्या सरासरीने २,८६९ धावा केल्या आहेत, ज्यात पाच शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने १२२ सामन्यांच्या १२० डावांमध्ये २३.४९ च्या सरासरीने आणि १२६.७९ च्या स्ट्राइक रेटने २,७०३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १६ अर्धशतकांचा समावेश असून त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या ८३ धावा आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech