भारतीय ग्रँडमास्टर प्रणेशला ‘कानिझा ओपन २०२६’चे विजेतेपद

0

नागिकानिझा (हंगेरी) : हंगेरीमधील नागिकानिझा येथे झालेल्या प्रतिष्ठित ‘कानिझा ओपन २०२६’ स्पर्धेत भारताच्या १९ वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम. याने शानदार कामगिरी करत ‘गट अ’चे विजेतेपद मिळवले. नवव्या आणि अंतिम फेरीत, पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना प्रणेशने जर्मनीच्या वादिम पेट्रोव्स्कीचा पराभव करून विजेतेपद निश्चित केले. २६७३ रेटिंग असलेला प्रणेश सध्या ऑगस्ट २०२६ च्या ताज्या फिडे जागतिक क्रमवारीत ४४ व्या स्थानावर आहे. नागिकानिझा येथील ‘कानिझा ओपन २०२६’ स्पर्धेतील विजयाबद्दल हंगेरीमधील भारतीय दूतावासाने १९ वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम. याचे अभिनंदन केले.

मध्य युरोपातील अत्यंत चुरशीच्या खुल्या स्पर्धांपैकी एक असलेल्या या स्पर्धेतील त्यांच्या प्रभावी कामगिरीचे दूतावासाने कौतुक केले आणि हंगेरीमध्ये भारतीय बुद्धिबळपटूंच्या वाढत्या यशावर प्रकाश टाकला. “भेटा नवीन भारतीय बुद्धिबळ चॅम्पियनला!! प्रणेश एम. नागिकानिझा, हंगेरी येथील प्रतिष्ठित ‘कानिझा ओपन २०२६’ स्पर्धेत शानदार विजय मिळवल्याबद्दल भारतीय ग्रँडमास्टर प्रणेश एम. यांचे खूप खूप अभिनंदन!” असे भारतीय दूतावासाने ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

“रोमांचक अशा नवव्या फेरीनंतर, प्रणेशने मध्य युरोपातील सर्वात चुरशीच्या खुल्या स्पर्धांपैकी एका स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले. जागतिक मंचावर भारतीय प्रतिभेला असे तेजस्वीपणे चमकताना पाहून आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. हंगेरी हे भारतीय बुद्धिबळासाठी सातत्याने यशस्वी ठरत आले आहे. त्याच्या बुद्धिबळाच्या प्रवासात त्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा,” असेही या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे. तमिळनाडूतील कराईकुडी येथील रहिवासी असलेल्या प्रणेशने नऊ फेऱ्यांतून सात गुण मिळवून स्पर्धेची सांगता केली आणि इतर तीन बुद्धिबळपटूंसह संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech