पाकिस्तानसोबतच्या युद्धबंदीचा दावा भारताने फेटाळला

0

नवी दिल्ली : भारताने चीनकडून करण्यात आलेला भारत–पाकिस्तान शस्त्रसंधीमध्ये मध्यस्थी केल्याचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. भारतीय सरकारमधील सूत्रांच्या मते, मे महिन्यात झालेल्या संघर्षादरम्यान शस्त्रसंधीपर्यंत पोहोचण्यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी झालेली नव्हती. सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, “मध्यस्थीबाबत भारताची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर कोणतीही मध्यस्थी झालेली नाही. भारताने कायमच सांगितले आहे की कोणत्याही तिसऱ्या पक्षाला हस्तक्षेप करण्याची परवानगी नाही. पाकिस्ताननेच शस्त्रसंधीसाठी भारताच्या डीजीएमओकडे (डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स) विनंती केली होती.”

दरम्यान, चीनने अलीकडेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यात मध्यस्थी केल्याचा दावा केला होता. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी मंगळवारी सांगितले की, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हा या वर्षी चीनने मध्यस्थी केलेल्या प्रमुख मुद्द्यांच्या यादीत समाविष्ट आहे. दरम्यान, ७ ते १० मे या कालावधीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष झाला होता. १० मे रोजी दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी घडवून आणल्याचा दावा अनेक वेळा केला आहे. मात्र, भारताने स्पष्ट केले आहे की ही शस्त्रसंधी दोन्ही देशांच्या सैन्यांच्या डीजीएमओंमधील थेट चर्चेनंतर झाली होती. भारताचे ठाम मत आहे की, भारत–पाकिस्तानशी संबंधित कोणत्याही प्रकरणात मध्यस्थी स्वीकार्य नाही.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech