शेतकऱ्यांच्या पदरात आनंदाचा वर्षाव: कर्जमाफीसह प्रामाणिक कर्जदारांनाही ५० हजारांचे बक्षीस!

0

मुंबई :  महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बळीराजासाठी आनंदाचा वर्षाव केला आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर उतरवण्यासाठी त्यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली आहे. दिवंगत अजितदादांच्या निधनानंतर अर्थमंत्रालयाची सूत्रे हाती घेतलेल्या फडणवीसांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पातून शेती अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणारा हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज थेट माफ केले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत आहे, अशा लाखो अन्नदात्यांना या निर्णयामुळे मोठा आधार मिळणार आहे. अवकाळी पाऊस आणि शेतीमालाच्या दरातील अनिश्चिततेमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना ‘संजीवनी’ ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

केवळ कर्ज थकवणाऱ्यांनाच नव्हे, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांचाही सन्मान करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता जाहीर करण्यात आला असून, यामुळे ‘प्रामाणिकपणाचा फायदा’ थेट शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. “शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याचे आर्थिक ओझे कमी करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे,” अशा शब्दांत फडणवीस यांनी या योजनांचे महत्त्व अधोरेखित केले. या दुहेरी धमाक्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाचे वातावरण असून, हा अर्थसंकल्प बळीराजाला खऱ्या अर्थाने बळ देणारा ठरला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech