मुंबई : पुण्याच्या आयटी हब मानल्या जाणाऱ्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये नोकरीच्या नावाखाली तब्बल एक हजार फ्रेशर्स पदवीधरांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात कामगार विभागाने आक्रमक पवित्रा घेत तातडीने हस्तक्षेप केला असून, दोषींना बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी विधानसभेत दिली. या कारवाईमुळे आयटी क्षेत्रातील फसवणूक करणाऱ्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
आमदार शंकर जगताप यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे या गंभीर फसवणुकीकडे आणि आयटी कर्मचाऱ्यांच्या असुरक्षिततेकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. फसवणूक झालेल्या तरुणांचे पैसे परत मिळवण्यासाठी ‘एसआयटी’ (SIT) चौकशीची मागणी करत, त्यांनी आयटी क्षेत्रातील सक्तीचे राजीनामे आणि कपात यावर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त केली. यावर उत्तर देताना मंत्र्यांनी स्पष्ट केले की, संबंधित प्रकरण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून फसवणूक झालेल्या तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
आयटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकार आता मोठी पावले उचलत असून, लवकरच नवीन नियमावली तयार केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या नवीन कामगार संहितेनुसार आयटी क्षेत्रासाठी ‘स्वतंत्र ट्रिब्यूनल’ स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे. हे नियम अंतिम झाल्यानंतर राज्यात त्याची तातडीने अंमलबजावणी केली जाईल. यामुळे कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण जलद गतीने होण्यास मदत होणार आहे.
सध्या कामगार विभागामार्फत सामंजस्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र आता कायदेशीर संरक्षण अधिक कडक करण्यात येणार आहे. कामावरून विनाकारण कमी करणे किंवा जबरदस्तीने राजीनामे घेण्याच्या प्रकारांना चाप लावण्यासाठी शासन आता विशेष लक्ष देणार असल्याचे मंत्र्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.