मुंबई : माजलगाव येथे स्थापन झालेल्या आणि लातूरच्या बँकेतून व्यवहार करणाऱ्या ‘गुलजार ए रजा’ या संस्थेच्या कारभाराने आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. केवळ धार्मिक कार्यासाठी निधी गोळा करण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या या खेळाचा तपास थेट एटीएसकडे (ATS) सोपवण्यात आला असून, यामागे एखादे मोठे रॅकेट असण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत वर्तवली.
आमदार विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी धक्कादायक बाबी समोर आणल्या. या संस्थेच्या खात्यात केवळ स्थानिक नव्हे, तर परदेशातूनही सुमारे २५ लाखांची रक्कम जमा झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या चार वर्षांत चार जिल्ह्यांमधील ४०० ड्रॉप बॉक्सच्या माध्यमातून १८,५७३ देणगीदारांनी पैसे दिले आहेत, पण यातील बहुतांश लोकांची ओळख अद्याप पटलेली नाही. संशयाची सुई अधिक गडद झाल्याने संस्थेची सर्व बँक खाती तातडीने सील करण्यात आली असून, हा पैसा नेमका कुठे वळवण्यात आला, याचा सखोल शोध घेतला जात आहे.
या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे, हे स्पष्ट करताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले की, विविध कारणांसाठी नागरिकांकडून तब्बल ४.७३ कोटी रुपये गोळा करण्यात आले होते. याप्रकरणी आतापर्यंत दोन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, फरार असलेल्या आणखी दोन आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. एटीएसच्या समांतर तपासामुळे या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहारांचे आणि विदेशी कनेक्शनचे गूढ लवकरच उकलण्याची शक्यता आहे.