“थांबा आहे, शेवट नाही” — विधान परिषदेत शिंदेंचा भावनिक आणि राजकीय सूर
मुंबई : राज्य विधान परिषदेतील नऊ सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आज सभागृहात त्यांना भावनिक निरोप देण्यात आला. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “राजकारणात कधीच पूर्णविराम नसतो” असा मोठा संदेश देत सर्व सदस्यांच्या कार्याचा गौरव केला. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देत त्यांनी भविष्यात पुन्हा सभागृहात येण्याचा संकेतही दिला.
शिंदे म्हणाले की, विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद होत असले तरी आजचा क्षण हळवा आहे. “निरोप देणाऱ्यांची आणि घेणाऱ्यांची इच्छा नसली तरी प्रवासात थांबा येतोच. पण हा निरोप नाही, शुभेच्छांचा सण आहे,” असे ते म्हणाले. चैत्र नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निरोप अधिक भावनिक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, “सदस्य निवृत्त झाले तरी त्यांचे जनजीवन थांबत नाही. राजकारणात पूर्णविराम नसतो. हे सर्व सदस्य पुढेही सक्रिय राहतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, “यापैकी काही सदस्य पुन्हा सभागृहात येतील,” असेही ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, “त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस मनापासून शुभेच्छा,” असे सांगत त्यांनी सकारात्मक संदेश दिला.
उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या २४ वर्षांच्या सलग कार्याचा विशेष उल्लेख करत शिंदे म्हणाले की, त्यांनी उपसभापती म्हणून प्रभावी काम करत सत्य आणि न्यायाची भूमिका कायम ठेवली. त्यांना “शिवसेनेच्या रणरागिणी” म्हणत गौरविले. त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक करत हलक्या फुलक्या शैलीत पुणेरी बाकरवडीचाही उल्लेख त्यांनी केला.
अमोल मिटकरी यांच्या बुलंद वक्तृत्वाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, ते विदर्भातील फायरब्रँड नेता असून संत साहित्याचा अभ्यासही करतात. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या भावनिक बाजूचे दर्शन घडले. “त्यांच्यासमोर मोठी राजकीय कारकीर्द आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
शशिकांत शिंदे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ते साताऱ्याच्या मातीतून आलेले असून कामगार चळवळीतील सक्रिय नेतृत्व आहे. सर्वसामान्यांसाठी लढणारा नेता म्हणून त्यांची ओळख असून “शिंदे किसी से डरते नहीं” अशी त्यांची प्रतिमा असल्याचे त्यांनी सांगितले.
रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकरी प्रश्नांवर त्यांनी प्रभावी काम केले आहे. त्यांची संयमी आणि अभ्यासू भूमिका सभागृहासाठी महत्त्वाची ठरली.
राजेश राठोड यांच्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. ग्रामीण विकास आणि पायाभूत सुविधांवर त्यांचा भर राहिला असून ते शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
संदीप जोशी यांच्या कार्याचा गौरव करत शिंदे म्हणाले की, नागपूरचे माजी महापौर म्हणून त्यांनी प्रभावी काम केले. युवकांचे प्रश्न आणि शहर विकासावर त्यांची पकड आहे. “कार्यकर्ता जिवंत असेपर्यंत राजकारणातून संन्यास नाही,” असे सांगत त्यांनी हलक्याफुलक्या शैलीत ठाण्याच्या मिसळीचे निमंत्रणही दिले.
दादाराव केचे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी त्यांच्या साधेपणाचा आणि जनतेशी असलेल्या नाळेचा उल्लेख केला. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी केलेले काम उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय केणेकर यांच्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, मराठवाड्यातील धडाडीचे नेतृत्व म्हणून त्यांनी काम केले आहे. संभाजीनगरचे माजी उपमहापौर म्हणून त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवले असून संघटनात्मक अनुभवही मोठा आहे. अभिनयाची आवड आणि राजकारणातील संधी यावर त्यांनी विनोदी टिप्पणीही केली.
भाषणाच्या शेवटी शिंदे म्हणाले, “सहवास सुटला तरी नातं तुटत नाही. निरोप हा शेवट नसून नव्या प्रवासाची सुरुवात आहे,” असे सांगत त्यांनी काव्यपंक्तींद्वारे सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या.
शिंदे यांनी सांगितले की, या सर्व सदस्यांचे काम विधिमंडळाच्या इतिहासात नोंदले जाईल आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. शेवटी त्यांनी सर्व निवृत्त सदस्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या.