मुंबई : शिवसेना (UBT) गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे आपल्या खासदारकीच्या पुनर्वसनासाठी लवकरच अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा खळबळजनक दावा भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. उद्धव ठाकरे आपल्याला पुन्हा राज्यसभेवर पाठवतील याची खात्री उरली नसल्याने, राऊत आता उघडपणे काँग्रेसच्या वळचणीला जाण्याच्या तयारीत असल्याचा प्रहार बन यांनी गुरुवारी केला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
“संजय राऊत हे गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात पडद्याआडून राजकारण करत होते. आता त्यांची ही गटबाजी उघड झाली असून ‘ठाकरे विरुद्ध राऊत’ असा सामना रंगू लागला आहे,” असे नवनाथ बन म्हणाले. राऊत हे खासदारकी टिकवण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाऊ शकतात आणि म्हणूनच ते आता मशाल विझवून ‘हात’ हाती घेतील, असा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्रातील जनता या अंतर्गत कलहाचा पुरेपूर आनंद घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बाळासाहेब ठाकरेंच्या प्रखर हिंदुत्वाला तिलांजली देऊन ‘ओरंगजेब फॅन क्लब’ चालवणाऱ्या राऊतांना भाजपावर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, अशा शब्दात बन यांनी सुनावले. “भाजपा नव्हे, तर राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या सत्तेच्या हपापलेल्या वृत्तीमुळेच महाराष्ट्रात हिंदुत्वाचे अध:पतन झाले आहे. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या राऊतांचे हिंदुत्व बेगडी असून मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
“माझा जन्म शिवसेनेत झाला” या राऊतांच्या विधानाचा समाचार घेताना नवनाथ बन यांनी याला ‘हास्यजत्रेतील प्रहसन’ म्हटले. राऊतांनी पूर्वी शिवसेनेच्या विरोधात लिहिलेले लेख अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत. उबाठा गट संपवण्याची सुपारी राऊतांनी काँग्रेसकडून घेतली असून, हा गट पूर्णपणे विसर्जित केल्याशिवाय त्यांना चैन पडणार नाही, असा जळजळीत आरोपही भाजपा प्रवक्त्यांनी केला. राऊतांच्या संभाव्य पक्षांतरामुळे महाविकास आघाडीत पुन्हा एकदा भूकंप होण्याची चिन्हे दिसत आहेत.