युवकांमधील अमली पदार्थांच्या व्यसनाविरुद्ध लढण्यासाठी ध्यान उपयुक्त : उपराष्ट्रपती

0

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित‘ध्यान नेत्यांचे जागतिक संमेलन, समग्र जीवनशैली आणि शांततापूर्ण जगासाठी ध्यान’या परिषदेला संबोधित केले. ही परिषद पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटीज मूव्हमेंट आणि बुद्ध-सीईओ क्वांटम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.

उपराष्ट्रपतींनी आयोजक, वक्ते, ध्यानगुरू आणि सहभागी यांचे अभिनंदन करत ध्यानाच्या माध्यमातून समग्र जीवनशैली आणि जागतिक शांततेचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. तामिळ संत तिरुमूलर यांच्या शिकवणींचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की ध्यान म्हणजे अंतर्मनातील दीप प्रज्वलित करण्यासारखे आहे, जो अज्ञान दूर करून सत्य आणि शांततेकडे मार्गदर्शन करतो. तिरुमूलर यांनी मानवी शरीराला मंदिर मानले असून ध्यान हे अंतर्गत दैवीत्व जाणण्याचे साधन असल्याचे त्यांनी नमूद केले.

आजच्या जगात अनेक आव्हाने असल्याचे नमूद करत उपराष्ट्रपती म्हणाले की संघर्ष केवळ बाह्य स्वरूपातच नाही तर तो प्रत्येक व्यक्तीच्या मनातही अस्तित्वात असतो. अशा परिस्थितीत ध्यान शांतता, स्पष्टता आणि सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच इतरांचे ऐकण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढवते. उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले की ध्यानाची खरी शक्ती मानवामध्ये परिवर्तन घडविण्यात आहे. ध्यानामुळे ताणतणाव कमी होतो, एकाग्रता वाढते, भावनिक स्थैर्य सुधारते आणि अति विचार व अति काम करण्यासारख्या समस्यांवर नियंत्रण मिळवता येते.

उपराष्ट्रपतींनी अर्थपूर्ण जीवनाच्या मोबदल्यात भौतिक सुखाचा अविरत पाठलाग करण्याविरुद्ध सावध केले आणि असे निरीक्षण नोंदवले की, संपत्तीने सुखसोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, मात्र त्या जीवनावरच वरचढ ठरू नयेत. ध्यानामुळे विचारशक्ती वाढते आणि व्यक्तीला संतुलित व परिपूर्ण जीवन जगण्यास सक्षम करते, यावर त्यांनी भर दिला. ध्यानाची प्रक्रिया केवळ आध्यात्मिक साधकांसाठीच आहे हा भ्रम देखील त्यांनी दूर केला. हे सर्वांसाठी आहे आणि ते सामान्य व्यक्तींना उच्च चेतनेकडे नेऊ शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech