नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या मानहानी प्रकरणाची सुनावणी सोमवारी पुढे ढकलण्यात आली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते व खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात ही सुनावणी होती. फिर्यादी भाजप नेते विजय मिश्रा यांचे वकील संतोष पांडेय यांनी वेळ मागितल्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही. एमपी-एमएलए विशेष न्यायालयाचे दंडाधिकारी शुभम वर्मा यांनी पुढील सुनावणी १७ एप्रिल रोजी निश्चित केली आहे.
फिर्यादी विजय मिश्रा यांनी राहुल गांधी यांच्या व्हॉइस सॅम्पलचे विधी विज्ञान प्रयोगशाळेत परीक्षण करण्यासाठी अर्ज दाखल केला होता, ज्यावर राहुल गांधी यांचे वकील काशी प्रसाद शुक्ल यांनी आक्षेप नोंदवला आहे. राहुल गांधी यांना २०१८ मध्ये बेंगळुरू येथे तत्कालीन भाजप राष्ट्रीय अध्यक्ष व सध्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ‘हत्यारा’ असे संबोधत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ४ ऑगस्ट २०१८ रोजी जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते विजय मिश्रा यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता. न्यायालयाने २७ नोव्हेंबर २०२३ रोजी राहुल गांधी यांना खटल्यासाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. २० फेब्रुवारी २०२४ रोजी राहुल गांधी न्यायालयात हजर राहून जामीन मिळवला होता, तर २० फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांचे निवेदन न्यायालयात नोंदवण्यात आले.