या पोटनिवडणुकीत सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करावे – शरद पवार

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भावनिक आवाहन करत मतदारांना सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघात मतदानाचा हक्क अखंडपणे बजावत आल्याचे त्यांनी नमूद केले असून, यंदा मात्र प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने बाहेर जाण्यास मनाई करण्यात आल्यामुळे या वेळी मतदान करता येणार नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते स्वर्गीय अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असून, त्यांच्या स्मरणार्थच पक्षाने सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बारामतीकरांनी आपल्या प्रेम आणि विश्वासाला प्रतिसाद देत सुनेत्रा पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. निवडणूक आयोगाच्या पर्यायांची चौकशी करूनही मतदानासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने अत्यंत जड अंत:करणाने मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगितले असून, बारामतीतील मतदार आपले हे आवाहन मान्य करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech