अमित शाह यांच्या हस्ते ‘पुणे रन फॉर युनिटी’चा बिगुल!

0

पुणे : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पुणे रन फॉर युनिटी २०२६’ अर्थात पुणे राष्ट्रीय एकता दौडला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते १५ नोव्हेंबर रोजी फ्लॅग ऑफ करण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून आयोजित या मॅरेथॉनमध्ये ४० हजारांहून अधिक नागरिक सहभागी होणार आहेत. केनियासह आफ्रिकेतील विविध देशांतील आंतरराष्ट्रीय धावपटूही या स्पर्धेत सहभागी होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती राहणार आहे.

यंदाच्या दौडमधून ‘नशामुक्त युवा, सशक्त युवा आणि विकसित भारत’ हा संदेश दिला जाणार आहे. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करावा, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. राष्ट्रीय एकात्मतेसोबतच युवकांमध्ये आरोग्य आणि फिटनेसविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. या मॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन, १० मैल स्पर्धात्मक धाव, १० किलोमीटर स्पर्धात्मक धाव, ५ किलोमीटर फन रन आणि ३ किलोमीटर फॅमिली व बिगिनर रन अशा पाच गटांचा समावेश आहे. व्यावसायिक धावपटूंसह विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबीयांनाही या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. विविध गटांतील विजेत्यांना १० लाख रुपयांहून अधिक रकमेची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech