नवी दिल्ली : नेपाळच्या हिमालयीन भागातून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. नेपाळमधील सर्वात खोल तलाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘शे-फोक्सुंडो’ तलावाच्या परिसरात ट्रेकिंगसाठी गेलेले सहा भारतीय पर्यटक मुसळधार बर्फवृष्टीनंतर बेपत्ता झाले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. खराब हवामान आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे हे पर्यटक उंच पर्वतीय खिंडीत अडकले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
बेपत्ता झालेल्या सहा भारतीय पर्यटकांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. हे सर्व पर्यटक नेपाळमधील डोल्पा जिल्ह्यातील डोल्पो बुद्ध आणि शे-फोक्सुंडो ग्रामीण नगरपालिका क्षेत्रात ट्रेकिंगसाठी गेले होते.मिळालेल्या माहितीनुसार, हे पर्यटक नुमला पास आणि बाग्ला पास या पर्वतीय मार्गांवरून प्रवास करत होते. स्थानिक मार्गदर्शकांच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम आणि परिसरात झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे हे पर्यटक हिमवादळात अडकले असावेत किंवा वाटेतच अडकून पडले असावेत.
डोल्पा जिल्ह्याच्या मुख्य जिल्हा अधिकारी जुनू हमाल यांनी सांगितले की, खराब हवामान आणि बर्फवृष्टीमुळे स्थानिक नागरिकांनी या पर्यटकांना पर्वतीय खिंडी ओलांडून न जाण्याचा सल्ला दिला होता. तसेच धोकादायक परिस्थितीबाबत त्यांना आधीच सावध करण्यात आले होते. मात्र, तरीही पर्यटकांनी आपला प्रवास सुरूच ठेवला. डो येथून फोक्सुंडो तलावाच्या दिशेने परतत असताना ही दुर्घटना घडली. शे-फोक्सुंडो ग्रामीण नगरपालिकेचे अध्यक्ष धावा समदुक गुरूंग यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक ४ आणि ८ यांच्यामधील पर्वतीय भागात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही. त्यामुळे मोबाईल सिग्नल नसल्याने बेपत्ता पर्यटकांचे नेमके ठिकाण आणि त्यांची सद्यस्थिती शोधण्यात मोठ्या अडचणी येत आहेत.
बेपत्ता पर्यटकांचा शोध घेऊन त्यांची सुटका करण्यासाठी नेपाळ लष्कराचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच खराब हवामान आणि जोरदार बर्फवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शोधमोहीम अधिक वेगाने राबवण्यासाठी विशेष हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाने केली आहे. या घटनेनंतर डोल्पा जिल्हा प्रशासनाने अत्यंत कमी तापमान आणि खराब हवामान लक्षात घेता अन्य पर्यटक व ट्रेकर्सना धोकादायक भागांत न जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच सर्वांनी सुरक्षित ठिकाणी राहावे, असा कडक सल्लाही प्रशासनाने दिला आहे.