बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जी यांना पराभवाची झालमुडी खाऊ घातली – एकनाथ शिंदे

0

आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा कमळ,  सुनेत्रा पवार यांच्या विक्रमी विजयाबद्दल केले अभिनंदन

मुंबई : शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम बंगाल व आसाम येथील निवडणूक निकालांचे स्वागत केले आहे. हा भव्य विजय म्हणजे भारतीय जनता पक्षावरील जनतेच्या विश्वासाची तसेच, विकासाभिमुख राजकारणावरील पसंतीची मोठी पावती असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे. आजचे विधानसभा निवडणुकीचे निकाल देशातील राजकारणाला निश्चितपणे नवी दिशा देतील, असा विश्वास त्यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधताना व्यक्त केला.

पश्चिम बंगालने दिला परिवर्तनाचा कौल
पश्चिम बंगालमधील निकालांवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये प्रथमच पूर्ण बहुमतासह कमळ फुलणे हा लोकशाहीचा खरा विजय आहे. जनतेने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची गुंडागर्दी आणि भ्रष्टाचार पूर्णपणे नाकारला आहे. जनतेने विकास, स्थैर्य आणि शांततेच्या बाजूने कौल दिला आहे. शिवाय, बंगालच्या जनतेने यावेळी ममता बॅनर्जी यांना पराभवाची झालमुडी खाऊ घातल्याचा टोलाही शिंदे यांनी लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आता बंगालमध्ये ‘डबल इंजिन’ सरकारद्वारे विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे. त्याचवेळी, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरुद्ध जनतेच्या मनात असलेला रोष मतदानातून स्पष्ट दिसून आला असून, “सबका साथ, सबका विकास” या धोरणाला बंगालमध्ये व्यापक पाठिंबा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

रणनीती, संघटनशक्ती आणि कार्यकर्त्यांचा संघर्ष
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आखलेल्या चाणक्यासारख्या रणनीतीमुळे ममता बॅनर्जींचा अभेद्य किल्ला कोसळला आहे. अमित शाह यांची भक्कम रणनीती, तसेच, तळागाळातील कार्यकर्त्यांची अथक मेहनत यामुळे हा ऐतिहासिक विजय शक्य झाला आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या भूमीत भाजपचा विजय हा विचारांच्या विजयाचा क्षण असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील ही यशस्वी कामगिरी विशेष महत्त्वाची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दडपशाही सहन करतही कार्यकर्त्यांनी उभारलेला लढा आज यशस्वी ठरल्याचेही त्यांनी सांगितले.

आसाममध्ये विकासाच्या राजकारणाला जनतेची पसंती
आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता देत जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्वा सरमा यांच्या कार्यशैलीवर शिक्कामोर्तब केले आहे. हा विजय म्हणजे विकास, स्थैर्य आणि पारदर्शक प्रशासन यांना मिळालेली जनतेची ठाम साथ असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

बारामतीतील विजयाचेही स्वागत
याचबरोबर, महाराष्ट्रातील बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विक्रमी विजयाबद्दलही एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले. बारामतीच्या जनतेने विकासाभिमुख राजकारणाला पाठिंबा देत अजित पवार यांच्या प्रगतिशील विचारांना कौल दिला आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. देशभरात विकास आणि सुशासनाच्या मुद्द्यांवर आधारित राजकारण अधिक बळकट होत असल्याचे या निकालांतून स्पष्ट होत आहे. आगामी काळात याचा सकारात्मक परिणाम देशाच्या प्रगतीवर दिसून येईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

तामिळनाडूमध्ये एम. के. स्टॅलिनच्या पराभवावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी तामिळनाडूच्या जनतेचे आभार मानले. ते म्हणाले की, स्टॅलिन अनेकदा सनातन आणि हिंदुत्वाबाबत वादग्रस्त विधाने करत असे, त्यामुळे तेथील जनतेने त्याला धडा शिकवून पराभूत केले. शिंदे म्हणाले की, या निकालावरून हे स्पष्ट होते की लोकशाहीमध्ये जनताच सर्वोच्च असते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech