मुंबई : योग ही भारताची अत्यंत प्राचीन आणि समृद्ध चिकित्सा पद्धती असून संपूर्ण जगाने योगविद्येचे महत्त्व ओळखले आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी केले. संपूर्ण जगासह महाराष्ट्रातही आज आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत जुहू बीच, मुंबई येथे १२ व्या भव्य आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित ‘योगा ऑन द बीच’ कार्यक्रम संपन्न झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांनी अत्यंत कमी कालावधीत एकमताने मंजूर केला, ही भारतासाठी अत्यंत गौरवाची बाब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, आज केवळ भारतातच नव्हे तर जपान, चीन, युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह जगातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर योग दिन साजरा केला जात आहे. योगविद्येबाबत संपूर्ण जगात उत्सुकता निर्माण झाली असून विविध समाजघटक त्याचा स्वीकार करत आहेत. भारतीय ज्ञानपरंपरेतील हा अमूल्य वारसा आता जागतिक आरोग्य चळवळीचा महत्त्वाचा भाग बनला आहे.

आज संपूर्ण जगभरात योगाचा व्यापक प्रसार झाला असून योगविद्येबाबत मोठ्या प्रमाणात कुतूहल निर्माण झाले आहे. सध्याच्या जीवनशैलीमुळे निर्माण होणारे आजार आणि नॉन-कम्युनिकेबल डिसीजेस ही मोठी समस्या असून त्यावर योग हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. नियमित योगाभ्यासामुळे व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहून संकटांचा सामना करण्याची क्षमता विकसित होते. भविष्यात सशक्त आणि निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी योगविद्येचा अधिकाधिक प्रचार व प्रसार होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले. तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देत सर्वांना निरोगी राहण्याचा संदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिला. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार रवींद्र वायकर, आमदार अमीत साटम व इतर मान्यवर उपस्थित होते.