‘थलापती’ची जादू चालली, ठरले दुसरे ‘एनटीआर’
चेन्नई | प्रतिनिधी
तमिळनाडू विधानसभा निवडणूक निकालात अभिनेता विजय याच्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली. सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या आणि प्रस्थापित असलेल्या द्रमुकसमोर विजयच्या ७ प्रमुख आश्वासनांनी मोठे आव्हान उभे केले. पश्चिम बंगाल बरोबरच तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. राजकारणात नव्याने पदार्पण केलेल्या अभिनेता जोसेफ विजय याच्या टीव्हीके पक्षाने अनपेक्षित कामगिरी करत सत्ताधारी द्रमुक (डीएमके) आणि अण्णा द्रमुक (एआयएडीएमके) यांसारख्या दिग्गज पक्षांच्या गणितांना धक्का दिला आहे. विजय हे दुसरे ‘एनटीआर’ ठरले आहेत. विजयच्या जाहीरनाम्यातील ७ महत्त्वाच्या आश्वासनांनी विशेषतः महिला आणि तरुण मतदारांना आकर्षित केल्याचे प्राथमिक विशेषण सांगत आहे.
प्रस्थापितांच्या सत्तेचे गणित अडचणीत आणणारी ७ आश्वासने
विजयच्या पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात अशा काही घोषणा केल्या होत्या, ज्यांनी थेट तळागाळातील मतदारांच्या मनाचा ठाव घेतला –
१. महिलांना दरमहा २,५०० रुपये मदत: द्रमुक सरकार सध्या महिलांना १,००० रुपये देत असताना, विजयने ही रक्कम २,५०० रुपये करण्याचे आश्वासन दिले. या एका घोषणेने महिला मतदारांमध्ये मोठी फूट पाडली.
२. वर्षाला ६ मोफत गॅस सिलिंडर: महागाईच्या काळात गृहिणींना दिलासा देण्यासाठी वर्षाला ६ एलपीजी सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन मास्टरस्ट्रोक ठरले.
३. शिक्षण राज्याच्या सूचीत आणणार (‘नीट’ला विरोध): शिक्षणावरील केंद्राचे नियंत्रण कमी करून ‘नीट’ सारख्या परीक्षा तमिळनाडूतून रद्द करण्याच्या भूमिकेला विद्यार्थ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला.
४. बेरोजगारी भत्ता आणि जॉब कॅलेंडर: तरुणांसाठी नोकरभरतीचे निश्चित वेळापत्रक आणि नोकरी मिळेपर्यंत भत्ता देण्याचे आश्वासन प्रभावी ठरले.
५. शेतकरी कर्जमाफी आणि हमीभाव: कृषी क्षेत्रासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार हमीभाव आणि सहकारी बँकांमधील कर्जमाफीचा शब्द विजयने दिला होता.
६. मोफत वीज आणि शुद्ध पाणी: घरगुती वापरासाठी ठराविक युनिटपर्यंत मोफत वीज आणि प्रत्येक घराला शुद्ध पिण्याचे पाणी देण्याची हमी.
७. भ्रष्टाचारमुक्त आणि नशामुक्त प्रशासन: तमिळनाडूतून अमली पदार्थांचे जाळे नष्ट करणे आणि पारदर्शक प्रशासन देण्याचे आश्वासन.
राजकारणात तिसऱ्या शक्तीचा उदय : आतापर्यंत तमिळनाडूचे राजकारण केवळ द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्याभोवती फिरत होते. मात्र, या निकालांनुसार विजय यांच्या टीव्हीके पक्षाने सारी समीकरणे बदलवून टाकली. त्याने अनेक ठिकाणी द्रमुकच्या पारंपरिक मतांमध्ये मोठे भगदाड पाडले. विशेषतः शहरी आणि निमशहरी भागांत विजय यांच्या पक्षाला मिळालेला प्रतिसाद ‘अँटी-इन्कंबन्सी’ (सत्ताविरोधी लाट) दर्शवत आहे.
‘डीएमके’समोरचे आव्हान : मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकला ५ वर्षांच्या सत्तेनंतर विजयच्या लोकप्रियतेचा आणि त्याच्या लोककल्याणकारी आश्वासनांचा मोठा फटका बसला. राजकीय विश्लेषकांच्या मते, विजयने द्रमुकच्याच ‘सोशल वेलफेअर’ मॉडेलला अधिक प्रभावी आश्वासनांनी आव्हान दिले आहे.