वयाच्या दहाव्या वर्षी पदार्पण, पहिली फिल्म फ्लॉप ते मुख्यमंत्रिपदाकडे कूच; ‘थलपती’ विजयचा थक्क करणारा प्रवास!

0

चेन्नई | प्रतिनिधी

तमिळ चित्रपटसृष्टीचा ‘थलपती’ विजय आता खऱ्या अर्थाने ‘जन नायकन’ बनण्याच्या वाटेवर आहे. १० व्या वर्षी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या या अभिनेत्याने आज तामिळनाडूच्या राजकारणात एक मोठे वादळ निर्माण केले आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या निकलानुसार, विजयच्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाने ज्या प्रकारे मुसंडी मारली आहे, ते पाहता दक्षिणेच्या राजकारणात ४९ वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.

तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा अभिनेता ते तामिळनाडूचा संभाव्य मुख्यमंत्री… जोसेफ विजय चंद्रशेखर ऊर्फ ‘विजय’चा हा प्रवास एखाद्या ब्लॉकबस्टर चित्रपटापेक्षा कमी नाही. वयाच्या १० व्या वर्षी ‘वेत्री’ (१९८४) चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण करणाऱ्या विजयला सुरुवातीच्या काळात अनेक टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र, आज तोच विजय राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा सर्वात मोठा चेहरा बनला आहे.

फ्लॉप डेब्यु ते ‘थलपती’चा टॅग

विजयने १९९२ मध्ये ‘नालय्या थीरपू’ चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला. टीकाकारांनी त्याच्या लूकवर आणि अभिनयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पण खचून न जाता विजयने स्वतःवर काम केले आणि १९९६ मध्ये ‘पूवे उनक्कागा’ या चित्रपटाने त्याला पहिली मोठी यशस्विनी मिळवून दिली. त्यानंतर ‘गिली’, ‘पोकिरी’, ‘तुपाकी’, ‘मेर्सल’ आणि ‘लिओ’ सारख्या सलग ब्लॉकबस्टर चित्रपटांनी त्याला तमिळ प्रेक्षकांचा लाडका ‘थलपती’ बनवले.

४९ वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती: १९७७ ते २०२६

भारतीय राजकारणात सिनेसृष्टीतील कलाकारांनी मुख्यमंत्री होण्याचा इतिहास जुना आहे. मात्र, तमिळनाडूमध्ये आज ४९ वर्षांनंतर अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

* एमजीआर कनेक्शन: १९७७ मध्ये तमिळ सुपरस्टार एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून तामिळनाडूची सत्ता काबीज केली होती. आज बरोबर ४९ वर्षांनंतर (१९७७ ते २०२६) विजय त्याच मार्गावर असून तो मुख्यमंत्रिपदाचा प्रबळ दावेदार म्हणून समोर आला आहे.

* एनटीआर आणि विजय: ज्याप्रमाणे १९८३ मध्ये आंध्र प्रदेशात एन. टी. रामाराव (एनटीआर) यांनी अवघ्या नऊ महिन्यांत सत्ता मिळवून इतिहास घडवला होता, तसाच काहीसा करिश्मा विजयने त्याच्या ‘टीव्हीके’ पक्षाच्या माध्यमातून करून दाखवला आहे. प्रस्थापित द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावणारा विजय हा एनटीआरनंतरचा असा अभिनेता ठरतोय ज्याने राज्याच्या राजकीय भूगोलात मोठी उलथापालथ केली आहे.

‘जन नायकन’ बनण्यामागची रणनीती

१. टीव्हीके ची स्थापना: फेब्रुवारी २०२४ मध्ये विजयने ‘तमिळगा वेत्री कळघम’ची स्थापना करून २०२६ च्या निवडणुकीचे लक्ष्य ठेवले होते.

२. अस्मितेचे राजकारण: “प्रत्येक तामिळी माणसाचा सन्मान” ही घोषणा आणि शिक्षण-आरोग्य क्षेत्रातील मोफत सुविधांचे आश्वासन विजयसाठी गेमचेंजर ठरले.

३. तरुणांचा पाठिंबा: विजयच्या ‘फॅन क्लब्स’चे रूपांतर राजकीय कार्यकर्त्यांमध्ये झाले असून, ग्रामीण भागात त्याचे संघटन अत्यंत मजबूत आहे.

विजयने केवळ पडद्यावरच नाही, तर जमिनीवरही आपली ताकद सिद्ध केली आहे. जर अंतिम निकालातही हाच कल कायम राहिला, तर दाक्षिणात्य राजकारणात अभिनेता विजय हा नव्या युगाचा ‘एनटीआर’ किंवा ‘एमजीआर’ म्हणून ओळखला जाईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech