नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार केला. पश्चिम आशियातील संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या सात आवाहनांवर त्यांनी टीका केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “तडजोड करणारे” असे संबोधले. राहुल गांधी यांनी लिहिले, “मोदीजींनी काल जनतेकडून त्याग मागितला — सोने खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका, पेट्रोल कमी वापरा, खत आणि खाद्यतेल कमी वापरा, मेट्रोने प्रवास करा, घरातून काम करा. हे उपदेश नाहीत, तर अपयशाचे पुरावे आहेत.” ते पुढे म्हणाले, “१२ वर्षांत देशाला अशा टप्प्यावर आणले आहे की जनतेला काय खरेदी करायचे, काय नाही, कुठे जायचे, कुठे नाही, हे सांगावे लागत आहे. प्रत्येक वेळी जबाबदारी जनतेवर ढकलली जाते, जेणेकरून स्वतःच्या उत्तरदायित्वापासून बचाव करता येईल. देश चालवणे आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याची गरज अधोरेखित केली होती. त्यांनी प्रत्येक कुटुंबाने खाद्यतेलाचा वापर कमी करावा आणि नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन केले होते, जेणेकरून परकीय चलनाची बचत होईल आणि पर्यावरणाचे संरक्षणही होईल. पंतप्रधान सिकंदराबाद येथे एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, खाद्यतेलाचा वापर कमी केल्यास लोकांचे आरोग्य सुधारेल आणि देशाची अर्थव्यवस्थाही मजबूत होईल. ते म्हणाले, “खाद्यतेलाच्या आयातीवर देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च करावे लागते. प्रत्येक कुटुंबाने खाद्यतेलाचा वापर कमी केला, तर ते देशभक्तीचे मोठे योगदान ठरेल. त्यामुळे देशाच्या तिजोरीची स्थिती सुधारेल आणि प्रत्येक कुटुंब सदस्याचे आरोग्यही चांगले राहील.”
पंतप्रधानांनी रासायनिक खतांच्या आयातीवरील खर्चाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की भारत मोठ्या प्रमाणात परदेशातून रासायनिक खते खरेदी करतो. त्यांनी शेतकऱ्यांना त्यांचा वापर कमी करण्याचे आवाहन केले. “कृषी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च होते. आपण विदेशातून रासायनिक खते आयात करतो. त्यांचा वापर निम्मा करायला हवा आणि नैसर्गिक शेतीकडे वळायला हवे. त्यामुळे परकीय चलनाची बचत होईल आणि आपली जमीन व धरतीमाताही सुरक्षित राहील,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशभक्तीची नवी व्याख्याही मांडली. ते म्हणाले, “देशभक्ती म्हणजे केवळ सीमेवर प्राण देणे नाही. आजच्या काळात देशभक्ती म्हणजे जबाबदारीने जीवन जगणे आणि दैनंदिन आयुष्यात देशाप्रती आपली कर्तव्ये पार पाडणे.” पंतप्रधानांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचेही आवाहन केले. ज्या ठिकाणी मेट्रो आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे, तिथे त्यांचा वापर करावा, असे त्यांनी सांगितले. तसेच गरज भासल्यास कारपूलिंग करावे, मालवाहतुकीसाठी रेल्वेचा अधिक वापर करावा आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.