मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना काटकसर करण्याचे केलेले आवाहन आणि आर्थिक बचतीसंदर्भातील सूचनांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र टीका केली आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर प्रश्न उपस्थित करत अनेक मुद्द्यांवर स्पष्टता मागितली आहे. पंतप्रधानांनी सोन्याची खरेदी कमी करणे, पेट्रोल-डिझेलचा वापर घटवणे, गरज नसल्यास परदेश दौरे टाळणे, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे तसेच ‘वर्क फ्रॉम होम’चा अवलंब करण्याचे आवाहन केले होते. यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले.
राज ठाकरे यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर पूर्वीही अनेकदा वाढले होते, मात्र त्यावेळी कोणत्याही सरकारने जनतेला अशा प्रकारे काटकसर करण्याचे आवाहन केले नव्हते. त्यामुळे सध्याच्या आवाहनामागील कारण स्पष्ट केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, पेट्रोल-डिझेलचे दर कमी असतानाही नागरिकांना महाग दराने इंधन विकण्यात आले आणि त्यातून जमा झालेल्या महसुलाचा उपयोग कुठे झाला, याचे उत्तर सरकारने द्यावे. “चुका सरकारच्या आणि भुर्दंड जनतेला का?” असा थेट सवाल त्यांनी केला.
‘रेवडी संस्कृती’वरूनही त्यांनी सरकारवर टीका करत, निवडणुकांमध्ये मोफत योजनांचा वापर केला जात असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेचा उल्लेख करत त्यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाल्याचेही मत व्यक्त केले. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर भाष्य करताना त्यांनी, “सामान्य नागरिकांना परदेश प्रवास टाळण्याचे आवाहन केले जात असेल तर स्वतः पंतप्रधानांनीही आधी उदाहरण घालून द्यावे,” असे म्हटले. तसेच मोठ्या निवडणूक प्रचार दौऱ्यांमध्ये होणाऱ्या इंधन वापरावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
देशाच्या आर्थिक परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना त्यांनी रुपयाचे अवमूल्यन, विदेशी गुंतवणूकदारांचा बाजारातून बाहेर पडण्याचा कल आणि अर्थव्यवस्थेतील अस्थिरता यावरही भाष्य केले. अर्थव्यवस्था बाहेरून मजबूत दिसत असली तरी आतून कमकुवत होत असल्याचा दावा त्यांनी केला. राज ठाकरे यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचा उल्लेख करत, त्यांनी युद्धकाळातील आवाहन स्वतःपासून सुरू केले होते, असे सांगितले. तसेच सरकारनेही आधी स्वतःपासून काटकसर सुरू करावी, असे त्यांनी म्हटले. शेवटी त्यांनी संसदेत या विषयावर विशेष अधिवेशन बोलावून देशातील आर्थिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्याची मागणी केली. “प्रश्न विचारणे हा लोकशाहीचा भाग आहे, आम्ही विरोधक आहोत पण देशाचे शत्रू नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.