देशाकडे ६९ दिवसांचे कच्चे तेल आणि ४५ दिवसांचा एलपीजी साठा उपलब्ध – हरदीप पुरी

0

एलपीजी उत्पादन वाढवून दररोज ५४ हजार टन करण्यात आले

नवी दिल्ली : केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी मंगळवारी सांगितले की, भारताने देशांतर्गत स्वयंपाकाच्या गॅसचे (एलपीजी) उत्पादन ३५-३६ हजार टनांवरून वाढवून दररोज ५४ हजार टन केले आहे. त्यांनी सांगितले की, देशाकडे ६९ दिवसांचे कच्चे तेल आणि एलएनजी तसेच ४५ दिवसांचा एलपीजी साठा उपलब्ध आहे.

भारतीय उद्योग परिसंघाच्या (सीआयआय) वार्षिक व्यापार परिषदेला संबोधित करताना हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले की, उत्पादनातील वाढ ही देशाच्या ऊर्जा गरजा सुरक्षित करण्यासाठी आणि पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांची भरपाई करण्यासाठी उचललेले धोरणात्मक पाऊल आहे. पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाकडे सावधगिरीचा इशारा म्हणून पाहिले पाहिजे आणि पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेला आर्थिक ताण कमी करण्यासाठी उपाययोजनांवर विचार सुरू केला पाहिजे.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काटकसरीचे आवाहन हे पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संकटामुळे निर्माण झालेला आर्थिक ताण कमी करण्यासाठी उपाययोजनांवर विचार सुरू करण्याचे संकेत आहे. दरम्यान, हैदराबाद येथील एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे, शहरांमध्ये मेट्रोचा अधिक वापर करण्याचे, कारपूलिंगचा अवलंब करण्याचे, इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर करण्याचे, पार्सल वाहतुकीसाठी रेल्वे सेवांचा वापर करण्याचे आणि ‘वर्क फ्रॉम होम’ स्वीकारण्याचे आवाहन केले होते, जेणेकरून परकीय चलनाची बचत होऊ शकेल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech