ठाणे : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठाणे न्यायालयात हजेरी लावली. दोन हजार आठ मधील रेल्वे भरती दरम्यान मनसेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाशी संबंधित खटल्याच्या सुनावणीसाठी ते न्यायालयात उपस्थित होते. या प्रकरणात राज ठाकरे यांच्यासह आणखी सहा जणांनाही न्यायालयात बोलावण्यात आले होते. सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज ठाकरे यांचा जबाब नोंदवला असून, “या गुन्ह्याशी माझा काहीही संबंध नाही,” असे त्यांनी न्यायालयात स्पष्टपणे सांगितले.
दोन हजार आठ साली रेल्वे भरती प्रक्रियेदरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या वेळी रेल्वे मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले होते. “मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या,” असा आरोप करत मनसेच्या आंदोलनात उत्तर भारतीय उमेदवारांना लक्ष्य करण्यात आले होते, तसेच हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचे आरोपही या प्रकरणात करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्यासह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयात नेमकं काय घडलं?
१८ ऑक्टोबर २००८ ला रेल्वे विभागात परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली हे खरं आहे की खोटं? असा प्रश्न यावेळी न्यायाधीशांनी राज ठाकरे यांना विचारला, या प्रश्नाचं उत्तर देताना हे खोट असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर तुमच्या विरोधात खोटी केस केली असं तुमचं म्हणणं आहे, त्याचं कारण काय? असा सवाल यावेळी न्यायाधीशांनी राज ठाकरे यांना केला. यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, तेव्हा मी इथे नव्हतो, काही कारणानिमित्त नाशिकला गेलो होतो.
दरम्यान ज्या प्रकारे साक्षीदारांनी जवाब नोंदविले – त्यामध्ये आपल्या मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वेची परीक्षा देण्यसाठी आलेल्या उत्तर भारतीय परीक्षार्थ्यांना लाठी काठी घेऊन मारहाण केली असा आरोप आहे, याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? असा सवालही यावेळी न्यायाधीशांनी राज ठाकरे यांना विचारला. यावर उत्तर देताना हे खोटं असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आजच्या सुनावणीत न्यायाधीशांनी राज ठाकरे यांना वगळून इतर आरोपींवरील आरोप वाचून दाखवले. उत्तर भारतीय परीक्षार्थींना मनसे कार्यकर्त्यांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली, त्या मारहाणीत काही परीक्षार्थींना दुखापत झाली आणि ते जखमी झाले, असा मजकूर न्यायालयात नोंदवण्यात आला. त्यानंतर साक्षीदारांचे जबाबही वाचून दाखवण्यात आले. सुनावणी संपल्यानंतर राज ठाकरे यांच्यासोबत या प्रकरणातील पाच मनसे कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर फोटोही काढले.
याप्रकरणी पुढील सुनावणी १८ मे २०२६ रोजी होणार असून, त्या वेळी राज ठाकरे यांनी पुन्हा हजर राहण्याची गरज नसल्याचे त्यांच्या वकिलांनी माध्यमांना सांगितले. यापूर्वी डिसेंबर महिन्यात झालेल्या सुनावणीतही राज ठाकरे यांनी आपण गुन्हा कबूल करत नाही, असे न्यायालयासमोर सांगितले होते. तसेच न्यायालयीन प्रक्रियेला पूर्ण सहकार्य करू, असेही त्यांनी त्या वेळी नमूद केले होते. आजच्या सुनावणीमुळे या जुन्या प्रकरणाला पुन्हा एकदा गती मिळाली आहे.