ठाणे : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात विविध प्राधिकरणामार्फत सुरू असलेली सर्व कामे ही येत्या ३० मे पर्यंत पूर्ण करावीत. ३० मे नंतर कोणतेही काम घोडबंदर रोडवर सुरू राहणार नाही यासाठी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होतील या दृष्टीने संबंधित प्राधिकरणांशी समन्वय साधावा. आपत्ती काळात जलदगतीने नागरिकांना प्रतिसाद देण्याबाबतच्या सूचना देत असतानाच लोकप्रतिनिधीशी संपर्क ठेवण्याचे निर्देशही आज झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व प्राधिकरणांना दिले.
नागरी संशोधन केंद्र येथे झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त १, संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, यांच्यासह महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीएचे अधिकारी, मेट्रो, महावितरण, महानगर गॅस, रेल्वे आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मान्सून कालावधीत नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी नियंत्रण कक्ष, रेल्वे, कोस्ट गार्ड, पोलीस आणि महापालिकेतील सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवणे. पावसाळयात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास एकमेकांवर आरोप करु नयेत. सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर रहावे. भरतीच्या वेळांवर लक्ष ठेवून ज्या दिवशी जास्त उंचीच्या लाटा असतील त्या दिवशी आवश्यक त्या उपाययोजनांसह यंत्रणांनी सज्ज रहावे. तसेच सर्व विभागांचेआपत्ती व्यवस्थान कक्ष २४x७ कार्यान्वित ठेवण्याच्या सूचनाही आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.
सदर बैठकीत अतिवृष्टी, भरती, पूरसदृश्य परिस्थिती, तसेच खड्डे दुरूस्ती, सखल भागात साचणारे पाणी, पंपिंग स्टेशन, रस्ते दुरुस्ती, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद यावर विशेष भर देण्यात आला. रेल्वे प्रशासनाने स्थानक परिसरातील पाणी निचरा, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्याबाबत माहिती दिली. स्टेशन परिसरात ब्लिंकर, रिफ्लेक्टर आणि दिशादर्शक फलक बसवण्याबाबतही सूचना करण्यात आल्या. नागरिकांना वेळेत सूचना मिळाव्यात यासाठी विविध विभागांचे अधिकारी सतत संपर्कात राहून सामूहिक समन्वयाने काम करतील. तसेच मान्सून कालावधीत सर्व अधिकाऱ्यांनी आपले भ्रमणध्वनी सुरू ठेवावेत असे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.
खड्डा पडल्यास तात्काळ दुरूस्ती करावी : अतिवृष्टीच्या काळात रस्त्यावर खड्डा पडल्यास तो तातडीने दुरुस्त करण्यात यावा. रस्ता कोणत्याही प्राधिकरणाच्या अखत्यारितील असला तरी नागरिकांना त्रास होवू नये यासाठी मान्सून कालावधीत खड्डा दुरूस्त करण्याची कार्यवाही ठाणे महापालिका करेल असेही आयुक्तांनी नमूद केले. तसेच खड्ड्यांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही व्हावी यासाठी यासाठी प्रत्येक विभागात समन्वय अधिकारी नेमावा तसेच सर्व विभागांनी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून तात्काळ समन्वय साधून माहितीची देवाणघेवाण ठेवावी, असेही बैठकीत नमूद करण्यात आले.
सखल भागातील पंप कायान्वित असतील याची दक्षता घ्यावी : दरवर्षी ज्या सखल भागात पाणी साचते त्या ठिकाणी पंप बसविण्यात येणार आहे. या सखल भागाची यादी तयार करावी. पावसाळ्यात सदर ठिकाणचे पंप पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील याची खात्री करावी. तसेच प्रत्येक प्रभागात पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी हायड्रा मशीन, पंपिंग यंत्रणा व मनुष्यबळ सज्ज ठेवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.
कोस्टल रोडचे काम सुरू असलेल्या ठिकाणी दक्षता घ्यावी : कोस्टल रोडचे काम सुरू असलेल्या ठिकाणी मान्सून कालावधीत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी, कोस्टल रोडचे कामालगत असलेल्या वस्तीत पाणी साचणार नाही याकरिता आवश्यक उपाययोजना कराव्यात. मान्सून कालावधीत दर १५ दिवसांनी कोस्टल रोडचे काम सुरू असलेल्या ठिकाणी ठाणे महापालिका व एमएमआरडीच्या अभियंत्यांनी संयुक्त पाहणी करण्याच्या सूचनाही आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत दिल्या.
स्ट्रीट पोल व उघड्या केबल्सची तपासणी करावी : शहरातील स्ट्रीट पोल तसेच ज्या ठिकाणी उघड्या अवस्थेत असलेल्या केबल्सची तपासणी करावी. आपत्ती दरम्याने विजेचा पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घेणे व खंडीत झाल्यास लवकरात लवकर वीजेचा पुरवठा पूर्ववत करण्याबाबत दक्षता घ्यावी. शॉर्टसर्किटमुळे आग किंवा अन्य कोणती आपत्ती वीजेशी संबंधित असल्यास घटनास्थळी उपस्थित रहावे.
रुग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध करावा : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात साथीच्या रोगांवर उपाययोजना व पावसाळी आजारांवर औषधसाठा उपलब्ध करावा. रुग्णालयामध्ये बेडस् उपलब्ध ठेवावेत. पुरेशा प्रमाणात औषधे, पॅरामेडीकल स्टाफ तयार ठेवण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या
कंट्रोल रूम सज्ज ठेवावा : मान्सून कालावधीत सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) अधिक सक्षम करण्यात येणार असून, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. तसेच प्रभागसमिती निहाय नियंत्रण कक्ष तयार करण्याच्या सूचनाही संबंधित सहायक आयुक्तांना देण्यात आल्या.