जनसंघापासून ते भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रामाणिक मेहनतीमुळेच पक्षाचा सुवर्णकाळ – माजी आमदार नरेंद्र पवार

0

भाजपच्या दक्षिण रायगड जिल्ह्याचे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अलिबागमध्ये संपन्न

कल्याण : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली १९५१ रोजी भारतीय जनसंघाची स्थापना झाली असून जनसंघापासून ते भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रामाणिक मेहनतीमुळेच पक्षाचा सुवर्णकाळ अवतरल्याची भावना भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केली आहे. भाजपच्या दक्षिण रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा अलिबागमध्ये संपन्न झालेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानात ते इतिहास आणि विकास या विषयावर बोलत होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगाच्या अर्थकारणात भारतीय अर्थव्यवस्थेने गरुडझेप घेतली असून ‘ एक भारत – श्रेष्ठ भारत’ च्या दिशेनेही आपली दमदार वाटचाल सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नरेंद्र पवार यांनी भारतीय जनसंघ, भाजपच्या स्थापनेपासून ते आजच्या सुवर्ण काळापर्यंत घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींवर त्यांनी प्रकाशझोत टाकला. ज्यामध्ये पक्षाचा इतिहास, विचारधारा, राष्ट्रीय चळवळीतील योगदान तसेच भारतीय जनसंघापासून भाजपच्या स्थापनेपर्यंतचा राजकीय प्रवास, आणीबाणीविरोधातील लढा, रामजन्मभूमी आंदोलन, एकात्म मानववाद तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विविध योजनांची उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना सखोल माहिती दिली.

भाजपच्या विचारधारेचा भाग म्हणून ‘एकात्म मानववाद’, स्वदेशीचा पुरस्कार, भारतीयीकरण, शिक्षण व्यवस्था, राष्ट्रवाद आणि सांस्कृतिक वारसा यांसारख्या मुद्द्यांवर पक्षाची भूमिका ही आजच्या काळाची गरज बनली आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे गरीब कल्याण, डिजिटल इंडिया, जी-२० परिषद, आर्थिक विकास, दहशतवादविरोधी कारवाई, कलम ३७० हटविणे, राम मंदिर उभारणी, तसेच ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनांमुळे आज जगभरात भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्णपणे बदलून टाकला आहे. पूर्वी दया – याचनेच्या भूमिकेत असणारा आपला देश आज जगातील महासत्ता म्हणून आत्मविश्वासाने पावलं टाकत असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

आज माहिती तंत्रज्ञान असो की विज्ञान, संरक्षण क्षेत्र असो की अंतराळ, एआय असो की कौशल्य विकास अशा प्रमूख क्षेत्रांमध्ये भारताने आपली क्षमता, ताकद आणि विश्वासार्हता सिद्ध केली आहे. जगभरात आज सगळीकडे अनिश्चितता असतानाही नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या परिणामकारक आर्थिक सुधारणांमुळे आपला देश जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे. ही ताकद, अशी जागतिक प्रतिमा इतका वेगवान विकास यापूर्वी देशाने कधीही अनुभवला नव्हता असे सांगत नरेंद्र पवार यांनी हे जनसंघापासून ते भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रामाणिक मेहनतीमुळे हे सोनेरी दिवस आपल्याला पाहायला मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच दिवंगत भाजप नेते डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली १९५१ मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना झाली. त्यानंतर पक्षाने विविध राष्ट्रीय प्रश्नांवर घेतलेली भूमिका राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या स्थापनेपर्यंतचा प्रवास,जम्मू-काश्मीर आंदोलन, गोवा मुक्ती आंदोलन, आणीबाणीविरोधातील संघर्ष, तसेच काँग्रेसविरोधी राजकारणाचा इतिहासही नरेंद्र पवार यांनी यावेळी उलगडून सांगितला.

या प्रशिक्षण अभियानाद्वारे पक्ष कार्यकर्त्यांना भाजपचा इतिहास, संघटनात्मक रचना, विचारधारा आणि केंद्र सरकारच्या धोरणांची माहिती देऊन आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील जी पाटील, प्रशिक्षण व्यवस्थापक गिरीश जी तुळपुळे , जिल्हा प्रशिक्षण प्रमुख तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैकुंठ जी पाटील , महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा चित्रा ताई पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आस्वाद पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech