– मंत्री, अधिकार्यांनी किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक वापरा
मुंबई : इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दोन उच्चस्तरिय बैठकीत विविध उपाययोजनांचा आढावा घेतला आणि त्यानुसार काही निर्णय जाहीर केले. या बैठकांना मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत घेण्यात आलेल्या प्रमुख निर्णयांमध्ये मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही तत्काळ प्रभावाने अर्ध्यावर आणण्यात यावी. बाहेरच्या प्रवासात असताना ताफ्यातील वाहनांची संख्या निर्धारित संख्येपेक्षा अधिक नसेल याची जबाबदारी संबंधित पोलिस आयुक्त किंवा पोलिस अधीक्षक यांची असेल.
मंत्री-अधिकार्यांनी कोणतेही विदेश दौरे करु नयेत. मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा शासकीय विमान, हेलिकॉप्टर यांचा वापर करु नये, त्याऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करावा. मंत्री-अधिकारी यांनी आवर्जून मेट्रो आदी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा. पहिल्या टप्प्यात किमान एक दिवस असा प्रयोग करावा. अधिकार्यांना बैठकांना बोलावण्याऐवजी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका घ्याव्यात. शासनात वितरित करण्यात आलेल्या वाहनांचा कोटेकोरपणे आढावा घेण्यात यावा. ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक होर्डिंग्ज/फ्लेक्सवरील कारवाई वाढवण्यात याव्यात आणि तेथे डेकोरेटिव्ह लायटिंगचा वापर होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी.
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ नये, या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने काटकसरीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्र सरकारचा कोणताही प्रतिनिधी किंवा शिष्टमंडळ यंदा फ्रान्समधील ‘कान्स चित्रपट महोत्सवा’साठी जाणार नाही. शासकीय कामकाजासाठी यापुढे केवळ इलेक्ट्रिक वाहनांचा (EVs) वापर आणि प्रशासकीय विभागांच्या सर्व बैठका ऑनलाइन (Virtual) घेतल्या जातील, याचा समावेश आहे.
कठीण काळात देशहिताला सर्वोच्च प्राधान्य – आशिष शेलार
मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यंदा फ्रान्स येथील ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. शेलार यांनी सांगितले की, “कठीण काळात देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देत विभागीय खर्चात संयम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, इथून पुढे जास्तीत जास्त बैठका व्हर्च्युअल (आभासी) माध्यमातून घेतल्या जातील आणि संसाधनांचा मर्यादित वापर करण्यावर भर दिला जाईल. कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होणारे मराठी चित्रपट आणि त्यासंदर्भातील आवश्यक समन्वय व सहकार्यासाठी संबंधित यंत्रणा नियोजित पद्धतीने कार्यरत राहतील. मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी जिथे आवश्यकता असेल, तिथे आपण ऑनलाइन माध्यमातून सहभागी होऊ, असेही शेलार यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांच्या आवाहनाची सरकार म्हणून अंमलबजावणी – उदय सामंत
पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना नेते आणि राज्यातील मंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मंत्री उदय सामंत यांनी माहिती देताना सांगितले की, “मंत्र्यांचे सर्व परदेश दौरे रद्द करण्यात आले आहेत. तसेच मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामंत यांनी पुढे सांगितले की, अनेक मंत्र्यांनी आता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू केला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील इलेक्ट्रिक कारचा वापर करत आहेत. “मी स्वतः मुंबई परिसरात ईव्ही गाडी वापरत आहे. सुरक्षिततेसाठी आवश्यक तेवढाच ताफा ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाची अंमलबजावणी सरकार म्हणून आम्ही करत आहोत, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.