सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
(अनंत नलावडे)
मुंबई : रायगड जिल्हा हा महत्त्वाचा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो.त्यातही दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटक अलिबाग, रोहा, तळा तसेच परिसरातील पर्यटनस्थळांना भेट देत असल्यामुळे या भागातील रस्ते दळणवळणाची सुविधा अधिक सक्षम व सुरक्षित असणे आवश्यक आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी अलिबाग-रोहा व तळा रस्त्याच्या कामांना गती देऊन ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावीत, असे सक्त,आणि स्पष्ट निर्देश बुधवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.
पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील या रस्त्यांच्या कामांच्या सद्यस्थिती व त्यावर करायच्या उपाययोजनांसाठी मंत्री भोसले यांनी आज मंत्रालयात एका आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी विद्यमान स्थितीतील कामांचा सविस्तर आढावाही घेतला.या बैठकीस खासदार सुनील तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते विभागाचे सचिव शरद राजभोज,उपसचिव शैलेश बोरसे, कार्यकारी अभियंता अलिबाग मोनिका धायतडक,उपविभागीय अभियंता रोहा विजय बागुल,उपअभियंता सुधागड-पाली दिनेश पराते यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अलिबाग-रोहा व तळा या ८५.६० किलोमीटर लांबीच्या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामास HAM पॅकेज-०१ अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाचे सुमारे ६४ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीनंतर उपस्थित पत्रकारांशी बोलताना मंत्री भोसले म्हणाले की, “रायगड जिल्ह्यात पर्यटना सोबतच औद्योगिक आणि स्थानिक वाहतुकीची मोठी गरज आहे.त्यामुळे दर्जेदार आणि सुरक्षित रस्ते निर्माण करणे ही शासनाची प्राथमिकता असून पावसाळ्या पूर्वी रस्त्याची उर्वरित कामे पूर्ण झाल्यास नागरिकांनाही मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून प्रकल्प वेळेत पूर्ण करावा, अशाही सक्त सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
यावेळी रस्त्याच्या प्रगतीबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. प्रकल्पातील प्रलंबित कामे, वाहतूक व्यवस्थापन तसेच पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजनां बाबतही चर्चा करण्यात आली.या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अलिबाग, रोहा, तळा परिसरातील दळणवळण अधिक गतिमान होणार असून पर्यटन, व्यापार व स्थानिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचा ठाम विश्वासही यांनी व्यक्त केला.