ठाण्यात गावदेवी मार्केटमध्ये अग्नितांडव, दोन जणांचा मृत्यू

0

ठाणे : ठाणे गावदेवी प्रभाग समिती कार्यालयाजवळील भाजी मार्केटला गुरुवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत होरपळून दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही आग विझवण्याचे प्रयत्न करताना अग्निशमन दलाच्या जवानांसह दोन ते तीन जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, वॉटर टँकर्स, दोन रेस्क्यू वाहनांसह आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. असे असले तरीही या भाजी मार्केटमधील अनेक दुकाने खाक झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, गावदेवी भाजी मंडईच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली आहे.

माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी : रात्री ३ वाजून ४० मिनिटांनी आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ५ फायर वाहनासहीत घटनास्थळी पोहोचले होते. याचबरोबर तीन जम्बो वॉटर टँकर, २ वॉटर टँकरसह, ४ रेस्क्यू वाहनासह आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. या ताफ्यामध्ये एका पिकअप वाहनासह, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, ठाणे महानगरपालिकेच्या तीन रुग्णवाहिका, १०८ रुग्णवाहिका, खाजगी वॉटर टँकरही पोहोचले होते. मृतांचे नाव : काळू शंकर गाडेकर (वय-५३ वर्षे), सागर शिंदे (वय ४३ वर्षे) हे दोघेही ठाणे महानगर पालिकेचे कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. तर जखमींची नावे : सुजित पष्टे (वय ४५ वर्षे) समीर जाधव (वय ४० वर्षे) हे दोघेही ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील कर्मचारी आहेत.

दोन वर्षांत झाल्या इतक्या आगीच्या घटना : समोर आलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मे महिन्यात १५० हून अधिक घटना घडल्याचे समोर आले आहे. तसेच, गेल्या दोन वर्षांत म्हणजेच २०२४ आणि २०२५ मध्ये अनके आगीच्या घटना ठाण्यात घडल्या आहेत. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२५ या वर्षभरात शहरात ७०० हून अधिक आगीच्या घटना नोंदवल्या गेल्या. तसेच, वाढत्या उन्हाळ्यामुळे आणि विजेच्या अतिवापरामुळे दरवर्षी आगीचे प्रमाण वाढत चालले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech