ठाणे : बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने 15 मे 2026 पासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे महानगरपालिका हद्दीतील ज्या ज्या भागात पाणी पुरवठा होतो त्या ठिकाणी १० टक्के पाणी कपातीची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. तसेच सर्व नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याबाबत व पाण्याची बचत करण्याबाबत विविध उपाययोजनासंबंधी सूचना देऊन नियोजनपूर्वक पाणीपुरवठा करावा अशा सूचना बृहन्मुंबई महापालिकेने ठाणे महापालिकेस दिल्या आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती निहाय खालील परिसरात पाणीपुरवठा करण्यात येतो. नौपाडा-कोपरी प्रभाग समिती : हाजुरी, लुईसवाडी, नामदेववाडी, आनंदनगर, गावदेवी जलकुंभ, टेंभी बंगला जलकुंभ, कोपरी धोबीघाट, कन्हैया नगर जलकुंभ, कोपरी, नौपाडा, पाचपाखाडी. लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती : साईनाथ नगर, रामचंद्र नगर, जिजामाता नगर, ज्ञानेश्वर नगर, करवाळो नगर, इंदिरानगर. वागळे प्रभाग समिती : किसननगर १ व २, शिवाजीनगर, पडवळनगर, भटवाडी, अंबिका नगर. माजीवाडा-मानपाडा प्रभाग समिती : बाळकुम पाडा १ व २, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, गांधीनगर.
या परिसरात दैनंदिन १० टक्के पाणी कपात पुढील आदेश प्राप्त होईपर्यत लागू राहणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. जलाशयांतील पाणीसाठा अधिकाधिक काळासाठी उपयोगात यावा या दृष्टीने खबरदारीचा उपाय तसेच भारतीय हवामान मान्सून विभागाने यंदा एल-निनो (El Niño) आणि आयओडी (IOD) परिस्थितीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ही उपाययोजना करण्यात येत आहे.