महाराष्ट्रात १ जूनपासून यंत्रचलित मासेमारीवर बंदी; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

0

रायगड : राज्याच्या सागरी क्षेत्रात येत्या १ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अध्यादेश २०२१ अंतर्गत ही ६१ दिवसांची पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) रायगड-अलिबाग संजय पाटील यांनी दिली. या बंदी कालावधीत यंत्रचलित व यांत्रिक नौकांद्वारे समुद्रात मासेमारी करता येणार नाही. मात्र पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यंत्रचालित नौकांना ही बंदी लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या आदेशानुसार, समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित नौकांनी १ जूनपूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक राहणार आहे. तसेच ३१ जुलैपूर्वी या नौकांना समुद्रात मासेमारीसाठी जाता येणार नाही. राज्याच्या सागरी क्षेत्राबाहेर म्हणजे किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढे खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौकांना केंद्र शासनाचे नियम लागू राहतील. दरम्यान, बंदी कालावधीत नियमभंग करून मासेमारी करताना कोणतीही यंत्रचलित किंवा यांत्रिक नौका आढळल्यास संबंधित नौका, मासेमारी साहित्य, उपकरणे आणि पकडलेली मासळी जप्त करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा) २०२१ च्या कलम १७ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

पावसाळी मासेमारी बंदीच्या काळात समुद्रात मासेमारी करताना अपघात झाल्यास संबंधित नौकांना शासनाकडून कोणतीही नुकसानभरपाई मिळणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. अलिबाग येथील सर्व मच्छिमार सहकारी संस्था, नौकामालक व संबंधितांनी या आदेशाची नोंद घेऊन बंदी कालावधीत नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात आले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech