नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

0

नवी दिल्ली : नीट-यूजी परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावरून राजकारण तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी केंद्र सरकार आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर निशाणा साधत काँग्रेस शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय शांत बसणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच परीक्षा प्रणाली पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हैदराबादमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा एक व्हिडिओ शेअर केला. आंदोलनकर्ते विद्यार्थी नीट पेपरफुटीविरोधात घोषणाबाजी करत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.

आपल्या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले की, “जेव्हा लाखो तरुण रस्त्यावर उतरले आहेत, २२ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागले आहे आणि पंतप्रधान मौन बाळगून आहेत, तेव्हा सरकार उत्तर देण्याऐवजी पळ काढत असल्याचे स्पष्ट दिसते.” त्यांनी पुढे म्हटले, “जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत आणि नीटसारख्या पेपरफुटी रोखण्यासाठी मजबूत व पूर्णपणे सुरक्षित व्यवस्था लागू होत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा लढा सुरू राहील.” दरम्यान, काँग्रेसकडून नीट-यूजी परीक्षा रद्द झाल्यानंतर शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली जात आहे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षा राखण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech