मुंबई : गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर प्रचंड चर्चेत असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांविरोधात पर्याय म्हणून उदयास येणाऱ्या या पक्षाच्या मागे देशातील तरुण मोठ्या संख्येने उभा राहत असल्याचे सांगत अण्णा हजारे यांनी सरकारने अशा युवा चळवळींकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला दिला.
कॉक्रोच जनता पार्टीचे नाव योग्य नसल्याचे मान्य करतानाच, “झुरळ हे नाव योग्य नसेलही, मात्र या पक्षामागे देशातील जनता आणि विशेषतः तरुणाई उभी राहत आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे,” असे अण्णा हजारे म्हणाले. या पक्षाने “झुरळ” हा शब्द कोणत्या उद्देशाने वापरला, हे समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती असते आणि जेव्हा या दोन्ही शक्तींचा संगम होतो, तेव्हा सरकारने त्यांना दडपण्याऐवजी प्रोत्साहन द्यायला हवे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी अण्णा हजारे यांनी राज्यातील लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीवरूनही नाराजी व्यक्त केली. लोकायुक्त कायद्याला मान्यता मिळूनही प्रत्यक्षात त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे सांगत, “आता लोकायुक्ताच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा आंदोलन करावे लागते की काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.