मुंबई : राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट कायम असताना २५ मेपासून ‘नवतपा’ सुरू झाला आहे. उन्हाळ्यातील सर्वात उष्ण मानले जाणारे हे नऊ दिवस २ जूनपर्यंत राहणार असून या काळात सूर्याची किरणे थेट पृथ्वीवर पडत असल्याने तापमानात मोठी वाढ होते. हिंदू पंचांगानुसार सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा नवतप्याची सुरुवात होते. विज्ञानाच्या दृष्टीने पाहिल्यास या काळात सूर्य कर्करेषेजवळ सरकत असल्याने उष्णतेची तीव्रता अधिक वाढते. त्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये तापमान ४५ ते ५२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान विभागाने उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक राज्यांमध्ये कमाल तापमान ४८ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला असून २८ ते ३० मेदरम्यान काही भागांत तीव्र वादळाचा इशाराही दिला आहे. महाराष्ट्रात विशेषतः विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये २५ ते ३० मेदरम्यान उष्णतेच्या लाटा कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रविवारी ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक ४७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, नागपूर, अकोला, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्येही तापमानाचा पारा ४४ ते ४५ अंशांदरम्यान होता.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना सोमवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर अकोला, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत आठ जणांचा आकस्मिक मृत्यू झाला असून हे मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
नवतप्याच्या काळात उष्माघात, चक्कर येणे, अशक्तपणा आणि शरीरातील पाण्याची कमतरता यांचा धोका वाढतो. विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक आणि उन्हात काम करणाऱ्यांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळणे, डोक्यावर टोपी किंवा छत्री वापरणे तसेच भरपूर पाणी, ताक, लिंबूपाणी आणि क्षारयुक्त द्रवपदार्थ सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. नवतपा संपल्यानंतर वातावरणात बदल होऊन मोसमी पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.