नवी दिल्ली : भारताच्या नौवहन महासंचालनालयाने मंगळवारी उशिरा रात्री माहिती दिली की, इराणमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या १० भारतीय खलाशांची सुटका करण्यात आली आहे. या खलाशांना जुलै २०२५ मध्ये एका तेलवाहू जहाजावरून ताब्यात घेण्यात आले होते. महासंचालनालयाच्या माहितीनुसार, एमव्ही हार्बर फिनिक्स या जहाजाच्या कर्मचाऱ्यांना इराणमधील जास्क बंदराजवळ जहाज रोखल्यानंतर ताब्यात घेण्यात आले होते. सातत्यपूर्ण राजनैतिक चर्चा आणि प्रयत्नांनंतर सर्व खलाशांची सुरक्षित सुटका करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, खलाशांना शक्य तितक्या लवकर भारतात परत आणण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली जात आहे. मात्र, त्यांच्या अटकेमागचे कारण किंवा जहाजाशी संबंधित प्रकरणाबाबत भारत सरकारने अधिक माहिती दिलेली नाही.
भारत आणि इराण यांच्यात दीर्घकाळापासून राजनैतिक आणि ऊर्जा क्षेत्रातील संबंध आहेत. त्याचवेळी भारताचे अमेरिका आणि इस्रायलसोबतही घनिष्ठ संबंध असल्याने या प्रकरणात भारताने संतुलित भूमिका कायम ठेवली. अहवालानुसार, खलाशांच्या सुटकेसाठी भारताने शांत राजनैतिक मार्ग अवलंबला आणि चर्चेदरम्यान सार्वजनिक वक्तव्ये टाळली. जहाज ट्रॅकिंग संकेतस्थळांनुसार, एमव्ही हार्बर फिनिक्स हे पलाऊच्या ध्वजाखाली नोंदणीकृत तेलवाहू जहाज आहे.
इराणी सुरक्षा दलांकडून आखाती प्रदेशात बेकायदेशीररीत्या इंधन वाहतूक केल्याचा आरोप असलेल्या जहाजांना वारंवार रोखण्यात येत असल्याच्या घोषणा केल्या जातात. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवरील देखरेख आणि निर्बंध अधिक कडक केले आहेत. २८ फेब्रुवारीपासून अमेरिका आणि इस्रायलने हल्ले सुरू केल्यानंतर ही कारवाई आणखी तीव्र झाली आहे.होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक मानला जातो. जगातील जवळपास पाचव्या भागाचे तेल आणि एलएनजी याच मार्गातून वाहून नेले जाते. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल आयातदार देश असून, आपल्या कच्च्या तेलापैकी जवळपास निम्मा पुरवठा याच समुद्री मार्गाद्वारे केला जातो.