राज्यातील तीन प्रमुख विद्यापीठांचे फॉरेन्सिक ऑडिट

0

पुणे : राज्यातील तीन प्रमुख विद्यापीठांच्या आर्थिक आणि प्रशासकीय कामकाजाची सखोल तपासणी करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या आर्थिक व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार आहे. या निर्णयानुसार पुणे विद्यापीठाच्या २०१७-१८ ते २०२५-२६ या नऊ वर्षांच्या कालावधीतील आर्थिक व प्रशासकीय कामकाजाची तपासणी होणार आहे. तर एसएनडीटी महिला विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २०२१-२२ ते २०२५-२६ या पाच वर्षांच्या कालावधीचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार आहे.

पुणे विद्यापीठातील आर्थिक व्यवहार, विविध विकास प्रकल्पांवरील खर्च, खरेदी प्रक्रिया तसेच प्रशासकीय निर्णयांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांकडून सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर शासनाने फॉरेन्सिक ऑडिटचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भातील सविस्तर परिपत्रक उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जारी केले असून, पुढील कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांना देण्यात आल्या आहेत. या फॉरेन्सिक ऑडिटमुळे विद्यापीठांमधील आर्थिक पारदर्शकता, निधीचा वापर आणि प्रशासकीय प्रक्रियांची सखोल पडताळणी होणार असून, अहवालानंतर अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech