पोलीस महासंचालकांची आवश्यक कृती गरजेची
मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात गेल्या काही वर्षांत महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे. सुमारे १७-१८ वर्षांपूर्वीच्या तुलनेत आज महिला पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली असली, तरी त्यांच्या कामकाजासंदर्भात काही तक्रारी आणि प्रश्न वेळोवेळी समोर येत असतात. अशाच काही मुद्द्यांकडे एका महिला पोलीस अधिकाऱ्यांनी एका वाहिनीवरील मुलाखतीत लक्ष वेधले असून, त्या अनुषंगाने वस्तुस्थिती समोर आणण्याची आवश्यकता असल्याचे मत शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यस्थळी लैंगिक छळविरोधी तक्रारींच्या निवारणासाठी समित्या कार्यरत आहेत. या समित्यांमध्ये वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतात. असे असतानाही काही महिला अधिकाऱ्यांकडून तक्रारी समोर येत असतील, तर त्यांची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे.
मुलाखतीत करण्यात आलेल्या आरोपांचा उल्लेख करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, काही पोलीस अधिकाऱ्यांवर विनयभंग किंवा बलात्कारासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असूनही ते महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, व अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये किती अधिकारी सध्या सेवेत आहेत, त्यांच्यावरील प्रकरणांची स्थिती काय आहे, याबाबतची माहिती पुनश्च तपासुन योग्य ते बदल करावेत .
महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली व नियुक्त्यांबाबतही काही अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या आहेत. कुटुंबीय जबाबदाऱ्या, मुलांचे संगोपन आणि इतर वैयक्तिक अडचणी यांचा विचार पोस्टिंग देताना पुरेशा प्रमाणात केला जात नाही, अशी भावना काही महिला अधिकाऱ्यांमध्ये असल्याचे समोर आले आहे. काही वेळा गैरसोयीच्या ठिकाणी काम करावे लागते, हे वास्तव असले तरी महिलांना जाणीवपूर्वक दुय्यम किंवा बाजूच्या पोस्टिंग दिल्या जात आहेत का, याचा आढावा घेणे हे पूर्णपणे पोलीस प्रशासनाच्या अंतर्गत परीक्षणाचा विषय असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.