मुंबई : देशाची राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पक्षाने आयोजित केलेल्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या आंदोलनातून देशातील युवकांच्या अभिव्यक्तीचे दर्शन घडले नसून अराजकता पसरवण्याची मानसिकता समोर आल्याचे त्यांनी म्हटले आहे. आंदोलनादरम्यान करण्यात आलेली भाषणे, घोषणाबाजी आणि विविध वक्तव्यांमधून संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांनाच नाकारण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हातात घेऊन संविधानानेच उभारलेल्या संस्था, व्यवस्था आणि लोकशाही प्रक्रियेला विरोध करणे हा मोठा विरोधाभास आहे. संविधान हे केवळ पुस्तक नसून त्यातील प्रत्येक अनुच्छेदामध्ये भारतीय लोकशाहीची मूलभूत तत्त्वे सामावलेली आहेत. ही तत्त्वे नाकारणारे लोक हातात संविधानाचे पुस्तक घेऊन फिरत असले तरी ते प्रत्यक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे आणि संविधानाच्या मूल्यांचे विरोधक असल्याची टीका त्यांनी केली. या आंदोलनातून संबंधित संघटनेचा खरा चेहरा आणि अराजकतेचे मनसुबे उघड झाले असून त्यांना कोणतेही व्यापक जनसमर्थन मिळालेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सोशल माध्यमांच्या बळावर कोट्यवधी अनुयायी निर्माण करणाऱ्या कॉकरोच जनता पक्षाने आज प्रथमच मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून आंदोलन केले. दिल्लीतील जंतरमंतर परिसरात मोठ्या संख्येने युवक-युवती एकत्र जमले होते. त्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विविध मागण्या मांडल्या. या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केले.
अमेरिकेतून दिल्लीत दाखल होताच अभिजीत दीपके यांनी आंदोलनात सहभाग घेतला. त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलनाला संबोधित केले. विमानतळाबाहेर येताना त्यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्राचे पुस्तक होते. त्यानंतर ते थेट आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. जंतरमंतरवरील या आंदोलनामुळे देशभरात राजकीय आणि सामाजिक चर्चांना वेग आला असून विविध स्तरांतून त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत.