काँग्रेसची भूमिका इतर पक्षांना सोबत घेऊन संपविण्याची – एकनाथ शिंदे
नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर इंडिया आघाडीची पहिली महत्त्वाची बैठक सोमवारी नवी दिल्लीत पार पडली. देशभरातील एकूण २५ राजकीय पक्ष या बैठकीत सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांचा सहभाग होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित होत्या, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन माध्यमातून सहभाग नोंदवला. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील ऑनलाईन सहभागी झाले होते.
बैठकीपूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची झालेली गळाभेट विशेष चर्चेचा विषय ठरली. इंडिया आघाडीचे नेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर आघाडीने पाच प्रमुख मुद्द्यांवर एकमत झाल्याची माहिती दिली. त्यानुसार, मतदार यादी विशेष पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेबाबत लवकरच भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र पाठविण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय पात्रता प्रवेश (नीट) परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
देशातील आर्थिक स्थिती, वाढती बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशीही मागणी करण्यात आली. इंडिया आघाडीच्या बैठका आता प्रत्येक दोन महिन्यांनी घेण्यात येणार असून पुढील बैठक हैदराबाद येथे होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. याशिवाय आगामी पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांमध्ये अधिक समन्वय साधण्यासाठी दररोज विरोधी पक्षाच्या कक्षात बैठक घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.
दरम्यान, या बैठकीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली. काँग्रेसची भूमिका इतर पक्षांना सोबत घेऊन त्यांनाच संपविण्याची असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसमुळे द्रविड मुन्नेत्र कळघम, राष्ट्रीय जनता दल आणि तृणमूल काँग्रेस यांसारख्या पक्षांना विधानसभा निवडणुकांत फटका बसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच काही लोक समाजमाध्यमांवरील थेट प्रक्षेपणासाठी येतात, स्वतःचा चेहरा दाखवतात आणि निघून जातात, असा टोला लगावत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला.