धारावीत देशातील पहिला मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब; नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य
२०२८ पर्यंत १० हजार घरे, १० वर्षांत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
(अनंत नलावडे)
मुंबई : धारावीचा पुनर्विकास हा केवळ इमारती उभारण्याचा प्रकल्प नसून लाखो धारावीकरांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारा विकासाचा महाप्रकल्प आहे. त्यामुळे सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण संकल्पनांच्या धर्तीवर धारावीचा कायापालट करण्यात येणार असून नागरिकांचे पुनर्वसन, रोजगार, स्थानिक उद्योग आणि सांस्कृतिक वारसा जपण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ठाम ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आढावा बैठकीत बोलताना दिली. त्याचवेळी त्यांनी संबंधित विभागांना स्पष्ट निर्देशही दिले.
धारावीकरच विकासाच्या केंद्रस्थानी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धारावीतील नागरिक, कामगार, छोटे व्यावसायिक आणि स्थानिक उद्योग हेच या प्रकल्पाचे केंद्रबिंदू असतील.व्यावसायिक विकासाबरोबरच लोकहित आणि रोजगार संरक्षणालाही समान महत्त्व दिले जाईल. कुंभारवाड्याची ओळख कायम राहणार धारावीचा सांस्कृतिक वारसा असलेल्या कुंभारवाड्याचे वैशिष्ट्य अबाधित ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे.पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या भागाचे जतन करत विकास साधला जाईल, अशी हमीही त्यांनी दिली.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २०२८ पर्यंत किमान १० हजार घरांचे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.नव्या घरांमध्ये स्वतंत्र स्वयंपाकघर, शयनकक्ष,स्वच्छतागृह, नैसर्गिक प्रकाश आणि महिलांसाठी स्वतंत्र सुविधा असतील.तसेच,धारावीत उभारल्या जाणाऱ्या अत्याधुनिक ट्रान्सपोर्ट हबमधून पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे, विविध मेट्रो मार्ग, रस्ते वाहतूक तसेच भविष्यातील बुलेट ट्रेनची जोडणी होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय विमान प्रवाशांसाठी ‘सिटी चेक-इन’ सुविधा,विमानतळासाठी एअरपोर्ट एक्सप्रेस कनेक्टिव्हिटी,जलवाहतुकीसाठी फास्ट जेट्टी,भविष्यातील हवाई टॅक्सी सेवेसाठी व्हर्टीपोर्ट,अशा जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.त्याचवेळी,धारावीतील चामडे, वस्त्रोद्योग, पुनर्वापर उद्योग, मातीची भांडी आणि खाद्यपदार्थ उद्योगांचे संरक्षण व विस्तार करण्यासाठी विशेष एमएसएमई योजना राबविण्यात येणार असून खाद्य व्यवसायासाठी आधुनिक ‘क्लाऊड किचन’ संकल्पनाही विकसित केली जाणार आहे.
बीकेसी ते धारावी मार्गावर हरित पट्टे, आधुनिक पदपथ आणि आकर्षक वास्तुरचना विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे हा संपूर्ण परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरी विकासाचे नवे मॉडेल ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
१० वर्षांत पूर्ण होणार महाप्रकल्प……
धारावी पुनर्वसन इमारतींचे काम ४२ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असून मार्च २०२८ पर्यंत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.त्यासाठी “सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्यास धारावीचा पुनर्विकास मुंबईच्या विकासाला नवी दिशा देईल आणि शहराला जागतिक दर्जाची ओळख मिळवून देईल,” असाही विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.