नवी दिल्ली : भारताने सोमवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला पुन्हा एकदा जोरदार फटकारले. पाकिस्तानचे खोटे दावे, दुटप्पी भूमिका आणि दहशतवादाला आश्रय देण्याचे धोरण भारताने उघडपणे जगासमोर मांडले. पाकिस्तानने आपल्या सीमेत कार्यरत असलेल्या काही गटांना ‘फित्ना-अल-हिंदुस्तान’ असे संबोधण्याच्या निर्णयाचा भारताने तीव्र निषेध केला. भारताने हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे सांगत पाकिस्तान सरकारवर बनावट कथानक (फेक नॅरेटिव्ह) पसरवल्याचा आरोप केला.
संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत हरीश पर्वथानेनी यांनी ‘अफगाणिस्तानातील परिस्थिती’ या विषयावरील सुरक्षा परिषद बैठकीत बोलताना सांगितले की, पाकिस्तानने सरकारी आदेशाद्वारे आपल्या यंत्रणांना देशातील काही गटांना ‘फित्ना-अल-हिंदुस्तान’ म्हणून संबोधण्याचे निर्देश दिले आहेत. धार्मिक शब्दावलीचा वापर करून सरकारी पातळीवर चुकीची माहिती आणि दिशाभूल करणारा प्रचार करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी पाकिस्तान सरकारने बलुचिस्तान प्रांतात सक्रिय असलेल्या सर्व विद्रोही गट आणि संघटनांना अधिकृतपणे ‘फित्ना-अल-हिंदुस्तान’ असे घोषित केले होते. पाकिस्तान सरकारने कोणताही ठोस पुरावा न देता या संघटना भारताच्या सांगण्यावरून दहशतवादी कारवाया करत असल्याचा आरोप केला होता. मात्र, भारताचे म्हणणे आहे की वास्तवात पाकिस्तानच दहशतवादाला आश्रय आणि पाठबळ देतो, तसेच स्वतःच्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी भारतावर निराधार आरोप करत राहतो.