इंडिया आघाडीतील नेतृत्वावरून नवा वाद

0

पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याबाबत स्पष्टतेची मागणी

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या इंडिया आघाडीतील नेतृत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा तीव्र झाली आहे. आघाडीत सक्षम समन्वयक नेमावा तसेच पंतप्रधानपदाचा संभाव्य चेहऱ्याबाबत स्पष्टता असावी अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. त्यामुळे आघाडीतील नेतृत्त्व संरचनेवर चर्चा रंगली आहे. इंडिया आघाडीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीसंदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आघाडीत विविध विचारसरणीचे आणि विविध राज्यांतील पक्ष एकत्र असल्याने प्रभावी समन्वयासाठी स्पष्ट नेतृत्व आवश्यक असल्याचे मत बैठकीत मांडण्यात आले. अन्यथा, आघाडीचा संदेश जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यात अडथळे येऊ शकतात, असे निरीक्षणही नोंदवले गेले.भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्पष्ट चेहरा असताना, विरोधी आघाडीत अद्याप पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित झालेला नाही. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी हा मुद्दा पुन्हा चर्चेत आणल्याचे सांगितले जाते.

आघाडीतील प्रमुख नेत्यांमध्ये राहुल गांधी, ममता बॅनर्जी, शरद पवार तसेच विविध प्रादेशिक पक्षांचे नेते यांचा समावेश असल्याने एकमत साधणे आव्हानात्मक ठरत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.हा मुद्दा केवळ राष्ट्रीय पातळीवरच नाही, तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या समीकरणांवरही परिणाम करू शकतो. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उबाठा) हे एकत्र काम करत असून, नेतृत्वाचा प्रश्न अनेकदा चर्चेत राहिला आहे.दिल्लीतील बैठकीत या मुद्द्यावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, समन्वयक नेमणे आणि पंतप्रधानपदाचा चेहरा निश्चित करणे याबाबत आघाडीतील प्रमुख पक्ष कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech