नाशिक : नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस कंपनीतील कथित सक्तीच्या धर्मांतरण आणि तथाकथित “कॉर्पोरेट जिहाद” प्रकरणात नवीन घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपींना कायदेशीर मदत देण्यासाठी इस्लाम पार्टीने पुढाकार घेतला असून, आरोपींना न्यायालयीन लढ्यासाठी वकील उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक रोड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश केदार जोशी यांच्या समोर शुक्रवारी झालेल्या सुनावणीत आरोपी निदा खान आणि अन्य दोन संशयितांच्या जामीन अर्जांवर सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपी पक्षाचे युक्तिवाद ऐकून घेतले असून, सरकारी पक्षाची बाजू ऐकल्यानंतर १९ जून रोजी जामीन अर्जावर निर्णय देण्यात येणार आहे.या प्रकरणातील आरोपी दानिश एजाज शेख याच्या वतीने अॅड. फैज वसीफ यांनी बाजू मांडली. त्यांनी न्यायालयासमोर अनेक कायदेशीर मुद्दे उपस्थित केल्याचे सांगितले. दानिश शेख याला अटकेनंतर प्रथम पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, आरोपी निदा खान हिच्या वतीने अॅड. राहुल कासलीवाल यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
इस्लाम पार्टीची एंट्री
या प्रकरणात यापूर्वी एमआयएमच्या भूमिकेची चर्चा झाली होती. आता मालेगावस्थित इस्लाम पार्टीनेही आरोपींच्या समर्थनार्थ कायदेशीर मदत जाहीर केली आहे.
सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना इस्लाम पार्टीचे नेते आणि माजी आमदार आसिफ शेख यांनी दावा केला की, या प्रकरणाला काही घटकांकडून धार्मिक स्वरूप देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्या मते, संबंधित व्यक्तींमध्ये केवळ मैत्रीचे संबंध होते आणि त्याला अनावश्यक धार्मिक रंग दिला जात आहे.
आसिफ शेख यांनी सांगितले की, आरोपी दानिश शेख यांच्या कुटुंबीयांनी मदतीसाठी संपर्क साधल्यानंतर पक्षाने त्यांना कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून दिले. तसेच, ही लढाई आवश्यक असल्यास उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी १९ जूनच्या सुनावणीकडे लक्ष
जामीन अर्जावरील सुनावणी यापूर्वी दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आता १९ जून रोजी होणाऱ्या सुनावणीत न्यायालय कोणता निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.