शिवसेनेचे खरे नेतृत्व एकनाथ शिंदेच करीत असल्याची जनभावना – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

0

मुंबई : शिवसेनेचे ख-या अर्थाने नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करीत असल्याची जनभावना असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज व्यक्त केले. शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमीत्त शुभेच्छा देतांना ना.रामदास आठवले यांनी शिवसेनेचे नेतृत्व उध्दव ठाकरेंपेक्षा ख-या अर्थाने एकनाथ शिंदेकडे असल्याची महाराष्ट्रातील लोकांची भावना असल्याकडे लक्ष वेधले. शिवसेनेचा ६० वा वर्धापनदिन उध्दव ठाकरे साजरा करीत असले, तरी ६० या अंकातले ६ एकनाथ शिंदे घेवुन गेले असून उध्दव ठाकरेकडे शुन्य शिल्लक राहिलेला आहे, असा खोचक टोला ना.रामदास आठवले यांनी आज उध्दव ठाकरेंना लगावला.

शिवसेनेची स्थापना दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी केली. त्यांनी अनेकदा रिपब्लिकन पक्ष, शिवसेना, भाजप एनडीए सोबत येत नसल्यामुळे शिवसेना भाजप युतीला महाराष्ट्रात आणि एनडीएला देशात सत्ता मिळत नसल्याचे मत दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केले होते. त्यांनी अनेकदा आपल्याला शिवसेना भाजप युतीसोबत येण्याचे आवाहन केले. त्यांची शिवशक्ती-भिमशक्ती युतीची मनापासुन इच्छा होती. त्यांची इच्छा साकार करण्याच काम आपण २०११ मध्ये शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती करून केले. शिवसेना, भाजपसोबत रिपब्लिकन पक्षाने शिवशक्ती-भिमशक्ती महायुतीचा प्रयोग केला. तेव्हापासुन शिवसेना भाजपकडे सत्ता आली. कॉग्रेसला सत्तेतुन हद्दपार करण्याचे काम रिपब्लिकन पक्षाने शिवसेना भाजप युतीला साथ दिल्यामुळे झालेले आहे.

२०१९ च्या निवडणुकीमध्ये मात्र उध्दव ठाकरे यांनी फार मोठी चुक केली. ज्या काँग्रेस ला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या हयातीमध्ये विरोध केला, त्या कॉग्रेससोबत युती करण्याचा चुकीचा निर्णय उध्दव ठाकरे यांनी घेतला. शिवसेना, भाजप, आरपीआय महायुती सोडुन उध्दव ठाकरे यांनी काँग्रेससोबत महाविकास आघाडीचा चुकीचा प्रयोग केला. त्या चुकीच्या निर्णयामुळेच त्यांचा पक्ष फुटला, त्यांच्या पक्षाचे चिन्ह गेले. त्यांच्या पक्षाचे खासदार सुध्दा निघुन गेले. उध्दव ठाकरेंवर ही वेळ येण्यामागे उध्दव ठाकरे यांनी घेतलेले चुकीचे निर्णय कारणीभुत आहेत.

त्यांनी जर २०१९ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साथ दिली असती तर शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीच्या सत्तेत उध्दव ठाकरे हे उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले असते. त्यातुन शिवसेनेचे कोणतेही नुकसान झाले नसते याची आठवण ना.रामदास आठवले यांनी करुन दिली. २०१९ मध्ये झालेल्या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या पध्दतीने शिवसेनेच नेतृत्व केलेले आहे ;त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता शिवसेनेचे खरे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहत असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech