देशात पावसाची ३७.८ टक्के तूट, जुलै, ऑगस्ट महिन्यांत एल निनो अधिक प्रभावी होण्याची शक्यता
मुंबई : देशभरात मान्सूनच्या प्रगतीने पुन्हा एकदा मोठी विश्रांती घेतल्याचे चित्र दिसत आहे. सलग तिसऱ्या वर्षी मान्सूनची वाटचाल जूनच्या मध्यात मंदावली आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा लांबली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत वातावरणात अनुकूल बदल होण्याची शक्यता असून, जूनच्या अखेरीस महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होऊ शकतो. महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनची गती मंदावल्याने शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे.
हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांच्या माहितीनुसार, २३ जूनपासून वातावरणात बदल होण्याची चिन्हे दिसू शकतात. त्यानंतर २५ जून ते १ जुलै या कालावधीत मुंबई, कोकण आणि किनारपट्टी भागात मान्सून अधिक सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर सह्याद्री पर्वत रांगा ओलांडून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यातही पावसाचे आगमन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मान्सूनची पश्चिमेकडील शाखा ८ जूनपासून जवळपास रेंगाळल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसेच देशातील इतर अनेक भागांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. तथापि, मागील दोन वर्षांचा अनुभव पाहता सुरुवातीच्या खंडानंतरही नंतरच्या काळात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सुमारे २९ जिल्ह्यांमध्ये उकाड्याचा त्रास वाढला असून, कोकणात दमट हवामानामुळे रात्रीही अस्वस्थता जाणवत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती चिंतेची ठरत आहे. तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना पेरणीबाबत सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. मान्सून अद्याप पूर्णपणे स्थिरावलेला नसल्याने घाईघाईने पेरणी केल्यास नुकसान होऊ शकते. पुरेसा आणि सातत्यपूर्ण पाऊस सुरू झाल्यानंतरच पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय हवामान निरीक्षण संस्थांच्या उपग्रह नोंदीनुसार, विषुववृत्तीय भागातील वातावरणीय प्रणाली अपेक्षित वेगाने सक्रिय झालेली नाही. त्यामुळे भारताकडे आर्द्रता खेचण्याची प्रक्रिया संथ झाली असून, मान्सूनचा वेगही कमी झाला आहे. त्याचवेळी ‘एल निनो’ परिस्थिती विकसित होत असल्याने काही भागांत दीर्घ कोरडे कालखंड आणि असमान पर्जन्यमान दिसून येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १७ जूनपर्यंत देशात केवळ ४६.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, या काळातील सरासरी ७४.३ मिलीमीटर आहे. त्यामुळे देशभरात सुमारे ३७.८ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. पूर्व भारतात मेघगर्जना आणि विजांच्या हालचाली वाढत असल्या तरी मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि पश्चिम भारतातील अनेक भागांत ढगांची घनता कमी असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, प्रशांत महासागरात सक्रिय होत असलेल्या ‘एल निनो’मुळे मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढल्यामुळे वातावरणातील वाऱ्यांच्या हालचाली बदलतात आणि त्याचा परिणाम भारताकडे येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांवर होतो. परिणामी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता निर्माण होते.
मान्सूनच्या प्रगतीबाबत प्रतिक्रिया देताना हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी सांगितले की, मान्सूनची रेषा रत्नागिरीच्या हर्णेपासून सातारा आणि सोलापूरमार्गे दक्षिण महाराष्ट्रापर्यंत पोहोचली होती. मात्र, त्यानंतर पुढील प्रगती होऊ शकली नाही. यामागील प्रमुख कारण म्हणजे अरबी समुद्रात मोसमी वाऱ्यांना अपेक्षित ताकद मिळाली नाही. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले नाही. या दोन्ही घटकांचा मान्सूनच्या पुढील वाटचालीवर थेट परिणाम झाला. मात्र आता अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही बाजूंनी परिस्थिती अनुकूल होत असल्याचे संकेत विविध हवामान मॉडेल्समधून मिळत आहेत.
एल निनो ही एक जागतिक हवामान प्रणाली आहे. ज्यामध्ये मध्य आणि पूर्व-उष्णकटिबंधीय पॅसिफिक महासागरातील समुद्राचे तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त वाढते. ही घटना दर २ ते ७ वर्षांनी उद्भवते आणि जगभरातील हवामानावर, विशेषतः मान्सूनवर तीव्र परिणाम करते. यंदा सुरुवातीला एल निनोचा प्रभाव उशिरा जाणवेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र तो अपेक्षेपेक्षा लवकर सक्रिय झाल्याने अनेक भागांमध्ये पाऊस कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. हवामान संस्थांच्या अंदाजानुसार जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत एल निनो अधिक प्रभावी होऊ शकतो.