“आम्हाला देखील ऑपरेशन कमळ करावे लागेल”- उद्धव ठाकरे

0

मुंबई : ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून आमदार-खासदार फोडले जात असतील तर आम्हालाही ‘ऑपरेशन कमळ’ राबवावे लागेल, असा इशारा शिवसेनेच्या उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. शिवसेना उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनी ते बोलत होते.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकप्रतिनिधी फोडण्याचे राजकारण करण्यापेक्षा थेट चर्चा करावी. आम्ही काही पाकिस्तानी नाही. आमच्या घराण्याला इतिहास आहे. आम्ही देशप्रेमी आहोत आणि तुमच्यापेक्षा कांकणभर जास्त देशप्रेमी आहोत असे ते म्हणाले. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर निशाणा साधताना हे हिंदुत्व गोमूत्रधाऱ्यांचे नसून भाजपाचे भोंदुत्व आहे. वारकऱ्यांचा आणि छत्रपतींचा भगवा वेगळा आहे. भगव्यात भेद करणारा अस्सल हिंदू असू शकत नसल्याची टीका ठाकरे यांनी केली.

देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना ठाकरे म्हणाले की, जनतेचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास कमी होत चालला आहे. “सोशल मीडियावर एक व्यंगचित्र पाहिलं. सोन्याची चोरी करणारा चोर पोलिसांना ‘चोरी’ म्हणू नका, ‘ऑपरेशन गोल्ड’ म्हणा, असं सांगतो. त्याप्रमाणे आता राजकारणातही फोडाफोडीला वेगवेगळी नावं दिली जात आहेत,” असा टोला त्यांनी लगावला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. विरोधी उमेदवारांना अर्ज दाखल करू दिला जात नाही, अशी खंत व्यक्त करत त्यांनी, बहुमत असूनही विरोधकांना संधी दिली जात नाही. ही लोकशाहीसाठी धोक्याची बाब असल्याचे सांगितले.

भाजपचे तत्कालिन राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या “एकच पक्ष राहील” या विधानाचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले, ‘वन नेशन, वन इलेक्शन’ हा एक भाग असू शकतो; मात्र सत्ताधाऱ्यांची वाटचाल “वन पार्टी, नो इलेक्शन”कडे सुरू आहे. देशात एकच पक्ष आणि सर्व सत्ता त्यांच्याच हाती असावी, अशी मानसिकता दिसत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

तरुणांना कॉकरोच म्हणण्याबद्दल देखील उद्धव ठाकरेनी सर्वोच्च न्यायालयाबद्दल नाराजी व्यक्त केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या खुदीराम बोस, अनंत कान्हेरे, भगत सिंग आणि शिवराम हरि राजगुरू यांची उदाहरणे देत त्यांनी तरुण शक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. आजची तरुणाई पेटून उठली तर कोणतेही सरकार टिकणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

यासोबतच शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या मानधनाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका करताना ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्याला हमीभाव नाही; मात्र खासदार-आमदारांचा हमीभाव ठरलेला आहे असा आरोप त्यांनी केला. यासोबतच त्यांनी सामान्य शिवसैनिकांनी मागणी केल्यास आपण पक्षप्रमुख पद सोडू अशी घोषणा केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech