न्यायव्यवस्थेचं यापेक्षा मोठं दुर्दैव नाही – ओमराजे निंबाळकर

0

मुंबई : यापेक्षा दुर्दैव ते काय. मला वाटतं न्यायव्यवस्थेचं यापेक्षा मोठं दुर्दैव असू शकत नाही. या खटल्याच्या निकालासाठी २० वर्षांचा मोठा कालावधी घेतला गेला, त्यानंतर असा निर्णय येत असेल तर हे दुर्दैवी आहे. कोर्टाने राजकीय वैमनस्य होतं, हे मान्य केले आहे, तरीही सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे, कोर्टाच्या निकालाचे पूर्ण वाचन करुन आणि सीबीआय काय निर्णय घेते, हे पाहावे लागेल, अशी प्रतिक्रिया पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले.

राज्याचं लक्ष लागलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल आज मुंबईतील सीबीआय कोर्टाकडून घोषित करण्यात आला. गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निकालामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

पोलिसांच्या तपासात त्रुटी होती, ही वस्तुस्थिती आहे, कारण पोलिसांवर दबाव होता. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात रिट याचिका केली होती, हा तपास सीबीयाकडे द्या. नंतर सीबीआयने तपास केला, मात्र मध्ये तीन वर्षे गेली. वरिष्ठ न्यायालयाकडून न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे. हत्या झाली ही वस्तुस्थिती आहे, राजकीय वैमनस्य असल्याचे कोर्टाने मान्य केले, मग पवनराजेंची हत्या कोणी केली, असा सवाल ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केला. निश्चितपणे अपेक्षा आहे की, उच्च न्यायालयात याबाबत सीबीआयने दाद मागावी. गेल्या २० वर्षांपासून आमचं कुटुंब न्यायासाठी संघर्ष करत आहे, ज्या लोकांनी हे नीच कृत्य केलंय, त्यांना शिक्षा व्हावी ही मागणी करण काही गैर आहे का, असेही ओमराजेंनी म्हटलं.

सीबीआयने उच्च न्यायालयातून न्याय मिळवून द्यावं, हीच अपेक्षा आहे. आज कोर्टाचा निकाल आलाय, मी माझ्या मतदारसंघात जाऊन, मतदारांशी चर्चा करुनच माझा राजकीय निर्णय जाहीर करेन. माझ्यासाठी कोर्टचा निर्णय महत्त्वाचा होता, म्हणून मी कुठल्याच बैठकीला गेलो नाही. तुम्ही कुठल्या पत्रकावर सही केलीय का? असा प्रश्न ओमराजेंना विचारण्यात आला होता. त्यावर, सध्या मी राजकीय भाष्य करणार नाही, माझा जो राजकीय निर्णय आहे, तो मी माझ्या मतदारांशी चर्चा करून जाहीर करेन, असेही ओमराजेंनी स्पष्ट केलं.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech