जेरुसलेम : इराणसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि जगभरातील बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भारत-इस्रायल संबंधांबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. सोमवारी त्यांनी सांगितले की, इस्रायल भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे.याचसोबत नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत कठीण काळात भारताकडून मिळालेल्या पाठिंबा आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
नेतान्याहू म्हणाले की, आम्हाला आणखी मजबूत आघाड्या निर्माण करण्याची गरज आहे. त्यामुळेच मी भारतासोबत आणि माझे मित्र नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे संबंध अधिक बळकट करण्यावर विशेष भर देत आहे. ते आमच्या सर्वात चांगल्या मित्रांपैकी एक आहेत. अनेकदा इस्रायल आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडल्याचे म्हटले जाते, परंतु भारतात इस्रायलला आणि मला वैयक्तिकरित्या मिळणारा पाठिंबा खरोखरच अविश्वसनीय आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी २०१८ मध्ये भारताचा महत्त्वपूर्ण दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान भारत आणि इस्रायल यांच्यात नऊ महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांनी या संबंधांना ‘विशेष भागीदारी’ असे संबोधले होते. या भागीदारीमुळे दोन्ही देशांमधील व्यापार, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम क्षेत्रातील सहकार्याला नवे बळ मिळाले. भारत आणि इस्रायलमधील संबंध २०२६ मध्ये आणखी मजबूत झाले आहेत. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचा दौरा केला होता. या भेटीदरम्यान दोन्ही देशांनी आपले संबंध ‘शांतता, नवोपक्रम आणि समृद्धीसाठी भारत-इस्रायल विशेष सामरिक भागीदारी’ या स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला.