मुंबई : राज्यात मान्सूनचे बहुतांश भागांमध्ये आगमन झाले असले तरी अनेक ठिकाणी अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यंदा मान्सूनच्या उशिरा झालेल्या आगमनामुळे खरीप हंगामातील शेतीची कामे आणि पेरण्या रखडल्या आहेत. मात्र आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस राज्यात मान्सून अधिक सक्रिय होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून उत्तर अरबी समुद्राच्या काही भागांसह गुजरात, महाराष्ट्रातील आणखी काही भाग, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात पुढे सरकण्याची शक्यता आहे. पश्चिमेकडील वारे सुमारे दीड किलोमीटर उंचीपर्यंत अधिक मजबूत झाले असून उत्तर सोमालिया किनारपट्टीलगत कमी दाबाचा वेगवान वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोकण विभागात पावसाचा जोर कायम राहणार असून पालघर, ठाणे आणि मुंबईसह अनेक भागांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पावसाचा पिवळा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही पुढील काही दिवस पावसाचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून या भागांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, केज आणि माजलगाव तालुक्यांत दमदार पावसाने हजेरी लावली असून गेल्या चोवीस तासांतील पावसामुळे खरीप पेरण्यांना गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. जून महिन्याचा बराच काळ उलटल्यानंतरही पाऊस न झाल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने मोठा दिलासा दिला आहे. मात्र परळी तालुक्यात अद्यापही पुरेशा पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
जळगाव जिल्ह्यातील अंजनविहिरे गावाजवळ झीरी नदीला पहिल्याच पावसात पूर आला असून नदीवरील बंधारा पाण्याखाली गेला आहे. परिसरातील मोठ्या आणि लहान नाल्यांना पूर आल्याने नदीला मोठा प्रवाह मिळाला. यामुळे शेतातील कोरड्या बोरवेल आणि विहिरींनाही पाणी लागल्याने जलस्रोत पुन्हा जिवंत झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातही जोरदार पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यभर पावसाच्या आगमनामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात जूनअखेर सरासरी ११.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून अक्कलकुवा तालुक्यात सर्वाधिक ३३.४ मिलीमीटर तर नंदुरबार तालुक्यात १७.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.