राम मंदिर प्रकरणावर पंतप्रधान अद्याप मौन का बाळगून – काँग्रेस

0

नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणगीत कथित अपहार प्रकरणावरून काँग्रेसने शनिवारी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. हा विषय देशातील लाखो रामभक्तांच्या श्रद्धेशी संबंधित असल्याने अत्यंत गंभीर असल्याचे सांगत, या प्रकरणावर पंतप्रधान अद्याप मौन का बाळगून आहेत, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला.

दिल्लीतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ते अखिलेश प्रताप सिंह यांनी श्रीराम जन्मभूमी मंदिर उभारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टवर गंभीर आरोप केले. मंदिराच्या उभारणीच्या सुरुवातीपासूनच विविध प्रकारच्या गैरव्यवहारांच्या तक्रारी समोर आल्या असल्याचा दावा त्यांनी केला. सुरुवातीला जमीन खरेदी व्यवहारात भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यानंतर मंदिर बांधकामात अनियमितता असल्याचे मुद्दे पुढे आले आणि आता मंदिरातील देणगीत कथित अपहार झाल्याचे प्रकरण समोर आल्याचे त्यांनी सांगितले.

राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या वादाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिल्याचा उल्लेख करत काँग्रेसने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. सुरुवातीला कोणतीही मोठी अनियमितता नसल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र नंतर ट्रस्टमधीलच एका वरिष्ठ सदस्याने हा प्रकार केवळ भ्रष्टाचार नसून लूट असल्याचे म्हटल्याचा आरोप काँग्रेसने केला.

अखिलेश प्रताप सिंह यांनी ट्रस्टने आर्थिक तपासणीसाठी नियुक्त केलेल्या संस्थांनी अनेक सूचना दिल्या होत्या, मात्र त्या दुर्लक्षित करण्यात आल्याचा आरोप केला. देणगीच्या मोजणीशी संबंधित एजंटने कथित गैरव्यवहार उघड केल्यानंतर त्याला पदावरून हटवण्यात आले. पुढे आणखी माहिती समोर येऊ लागल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे हटवण्यात आले आणि त्यांचे रेकॉर्डिंगही नष्ट करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. एसआयटीच्या अहवालानंतर काही कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल झाली असली तरी ट्रस्टमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही, असेही त्यांनी म्हटले. यापूर्वी काँग्रेसने या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली होती. या प्रकरणातील संपूर्ण सत्य बाहेर यावे आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी काँग्रेसची मागणी आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech