– दीड कोटींचा सौदा उघड
ठाणे : महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून या प्रकरणाचे दिल्ली आणि हरियाणा कनेक्शन उघड झाले आहे. २८ जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलण्यात आली असून भिवंडी पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. विमानतळ परिसरातून करण्यात आलेल्या कारवाईनंतर अपर पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी पत्रकार परिषद घेऊन तपासाची माहिती दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी राजीव शाह आणि आकाश कुमार हे बिहारचे रहिवासी असून धीरज कुमार हा हरियाणातील आहे. या पेपरची विक्री तब्बल दीड कोटी रुपयांत करण्याचा व्यवहार ठरल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांच्या गोपनीय माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात आरोपी अडकले. ते दिल्लीहून पेपर विक्रीसाठी भिवंडीत आले होते. आरोपींकडून चार संच प्रश्नपत्रिका, मोबाईल फोन आणि डेबिट कार्ड जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपी कोणासाठी पेपर घेऊन आले होते, कोणाला विकला जाणार होता आणि त्यामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह महाराष्ट्र परीक्षा अधिनियम २०२४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
जप्त करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका परीक्षा विभागाकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आल्या होत्या. त्या अधिकृत टीईटी परीक्षेच्याच प्रश्नपत्रिका असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले असून डीसीपी पवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. कोचिंग सेंटरसह इतर संबंधितांचीही चौकशी केली जाणार आहे. प्राथमिक तपासात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा थेट सहभाग आढळलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून २८ जूनची टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून परीक्षेची नवी तारीख पुढील दोन ते तीन दिवसांत जाहीर केली जाणार आहे. राज्यातील सुमारे ६ लाख १२८ उमेदवारांसाठी ही परीक्षा ३७ शहरांतील १०२८ परीक्षा केंद्रांवर पुन्हा आयोजित केली जाईल. उमेदवारांना पुन्हा अर्ज किंवा परीक्षा शुल्क भरावे लागणार नसल्याचे परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.