डॉक्टर्स डे” ला सरकारचा मेगा निर्णय…..!

0

तब्बल १,४०० डॉक्टरांना नियुक्ती, तरं ५ हजार पदभरतीचा बिगुल……!

(अनंत नलावडे)

मुंबई : राज्यातील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेवर विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या टीकेला उत्तर देत महायुती सरकारने आरोग्य क्षेत्रात मोठाच “मास्टरस्ट्रोक” खेळला आहे. ‘डॉक्टर्स डे’ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी विधानसभेत तब्बल १,४०० डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी झाल्याची घोषणा करत ५ हजार रिक्त पदांची भरती युद्धपातळीवर सुरू होणार असल्याचे जाहीर केले.त्यामुळे अनेक वर्षांपासून मनुष्यबळाच्या अभावामुळे अडचणीत आलेल्या सरकारी आरोग्य व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले की, राज्यातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असून या आठवड्यापासून भरती प्रक्रियेला वेग दिला जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १,९०० सीएचओ (CHO) पदेही तातडीने भरली जाणार असून, मनुष्यबळा अभावी बंद पडलेली उपजिल्हा रुग्णालये पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक कर्मचारी नियुक्त केले जातील. त्यामुळे ग्रामीण भागातील लाखो नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

आरोग्य पायाभूत सुविधांनाही सरकारने गती देण्याचा निर्णय घेतला असून ५० ते ९० टक्के पूर्ण झालेल्या रुग्णालयांच्या बांधकामांना प्राधान्याने निधी दिला जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या निधीबाबत समिती स्थापन केली जाणार असून कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित देयके तातडीने अदा करण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली.

याचवेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि लाभांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या एजन्सींना मंत्री आबिटकर यांनी कठोर इशारा दिला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन ते तीन संस्थांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले असून, संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे आरोग्य विभागातील गैरव्यवहारांवर सरकारने कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

या चर्चेदरम्यान आमदार विजय वडेट्टीवार, देवराव भोंगळे, डॉ.ज्योती गायकवाड, संजय मेश्राम, अजय चौधरी आणि सुलभा खोडके यांनी विविध उपप्रश्न उपस्थित केले.त्यांना उत्तर देताना मंत्री आबिटकर यांनी आरोग्य विभाग सक्षम करण्यासाठी सरकार कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले.मोठ्या प्रमाणातील डॉक्टर भरती, सीएचओ नियुक्त्या, बंद रुग्णालये सुरू करण्याचा निर्णय आणि गैरव्यवहार करणाऱ्यांवरील कारवाई यामुळे आरोग्य क्षेत्रात महत्त्वाचे बदल घडण्याची चिन्हे दिसत असून, त्याचे राजकीय पडसादही उमटण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech